Leslie Phillips: ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांचे निधन झाले आहे. 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कॅरी ऑन या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांना पसंती मिळाली. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
200 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम
ज्येष्ठ अभिनेते लेस्ली फिलिप्स यांच्या मृत्यूची माहिती एजंट जोनाथन लॉयड यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, लेस्ली फिलिप्स यांनी झोपेत असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन स्ट्रोक आले होते. लेस्ली फिलिप्स यांनी 80 वर्षांपेक्षा जास्त काळातील त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच त्यांनी टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांमध्ये काम केलं आहे.
लेस्ली फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 रोजी लंडन येथे झाला. कॅरी ऑन सीरिजच्या यशानंतर, लेस्ली फिलिप्स यांनी 'डॉक्टर इन द हाऊस', टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. लेस्ली फिलिप्स यांच्या आयकॉनिक वन लाइनर्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती.
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 2006 च्या व्हीनस चित्रपटात पीटर ओ टोल सोबतच्या त्यांच्या सहाय्यक कामगिरीबद्दल त्याला बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिलिप्स यांनी स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'एम्पायर ऑफ द सन' आणि सिडनी पोपच्या 'आउट ऑफ आफ्रिका' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला. 2012 मध्ये रिलीज झालेला आफ्टर डेथ हा लेस्ली फिलिप्स यांचा शेवटचा चित्रपट होता.
लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने अभिनेत्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या पतीच्या निधनाबद्दल एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या,'लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. तो कुठेही गेला तरी लोकांनी त्याला अपार प्रेम दिले.'
गेल्या महिन्यात हॅरी पॉटर हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: