Zee Studio On Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. 'हर हर महादेव' सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. त्यानंतर आता सिनेमाच्या वादावर झी स्टुडिओने भाष्य करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
झी स्टुडिओने खुलासा करत एक पत्र शेअर केलं आहे. यात लिहिलं आहे,"छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता! त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा/ विचारांचा अभ्यास करुन, संदर्भ घेऊन आम्ही 'हर हर महादेव'ची निर्मिती केली आहे. आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योद्धांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल".
झी स्टुडिओने पुढे माफी मागत लिहिल आहे,"या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निर्षधार्ह आहे. आमच्या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्णपणे विश्वास आहे".
'हर हर महादेव' सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे वादावर म्हणाले,"खरंतर आमचा जो स्टँड होता तो आम्ही सेन्सॉर बोर्डसमोर मांडला होता. आम्हाला सेन्सॉर बोर्डाने काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी आम्ही संबंधित इतिहासाचे दाखले तिथे दिलेले आहेत. त्यानंतरच आम्हाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे फार काही बोलणार नाही. पण सिनेमागृहात घडलेला प्रकार लांच्छनास्पद आहे. थिएटरमध्ये काही लोकांनी घुसुन सिनेमा बघायला आलेल्या आपल्या मराठी माणसांना मारहाण केली. त्यांना शिविगाण केली. त्यांचे कपडे फाडले".
संबंधित बातम्या