Subodh Bhave Birthday : मराठी सिनेसृष्टीतील बहुगुणी अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave).मराठी सिनेसृष्टीतील एकाहून एक अप्रतिम बायोपिक सुबोधच्या नावे आहेत. मराठीतला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावेचा आज 47 वा वाढदिवस आहे. 9 नोव्हेंबर 1975 रोजी सुबोधचा पुण्यात जन्म झाला. 


सुबोधने सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. तसेच अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.आयुष्यभर वेगवेगळे प्रयोग करत राहिल्यामुळे सुबोधला यश मिळालं आहे. अत्यंत संवेदनशील अभिनेता अशी सुबोधची ख्याती आहे.


बायोपिक गाजवणारा सुबोध भावे!


सुबोध भावेने साकारलेले बायोपिक विशेष गाजले आहेत. बालगंधर्वांचं हिमालयाएवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व सुबोधने रुपेरी पडद्यावर लिलया उभं केलं. 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमात सुबोधने काशीनाथ घाणेकरांची भूमिका समर्थपणे साकारली. 'लोकमान्य – एक युग पुरुष' या सिनेमातील सुबोधच्या कामाचं खूप कौतुक झालं. 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुबोधने सांभाळली. 


मालिकाविश्वात आजही सुबोधचा दबदबा...


सुबोध भावेने 'या गोजिरवाण्या घरात', 'वादळवाट', 'अवघाचि संसार', 'तुला पाहते रे', 'अवंतिका', 'कळत नकळत' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून काम केलं आहे. 'चंद्र आहे साक्षीला' ही सुबोधची मालिका गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या तो 'बस बाई बस' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


लाँग डिस्टन्स रिलेशनशिप ते लग्न.. सुबोधची लव्हस्टोरी जाणून घ्या...


सुबोध आणि त्याची पत्नी मंजिरी एका नाट्यशिबिरात भेटले. तेव्हा मंजिरी आठवीत होती. तर सुबोध दहावीत. तेव्हाच त्यांचं प्रेम जमलं. त्यानंतर मंजिरी तिच्या बारावीनंतर कुटुंबासह पुण्याहून कॅनडाला शिफ्ट झाली. त्यावेळी सोशल मीडिया नसल्याने ते मोठमोठी प्रेमपत्र एकमेकांना लिहित संवाद साधायचे. एकमेकांना पत्र मिळून त्यावर उत्तर यायला खूप दिवस जायचे. जवळपास पाच वर्ष सुबोध आणि मंजिरी लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. 


सुबोधला अभिनय जमत नाही म्हणून नाटकातून काढलं होतं...


सुबोध आज यशस्वी अभिनेता असला तरी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. सुबोध कॉलेजमध्ये असताना बारावीत नापास झाला होता. कॉलेजमध्ये असताना अभिनय जमत नाही म्हणून सुबोधला नाटकातून काढून टाकलं होतं. पण कालांतराने त्याला नाटकाची गोडी लागली. त्यानंतर अभिनय सुबोधच्या रक्तात भिणला. 


'आभाळमाया'ने दिला ब्रेक!


सुबोधला करिअरच्या सुरुवातीला यश मिळत नव्हते. छोट्या भूमिकांनी समाधान मिळत नव्हतं. अशातच तो 
'आभाळमाया' मालिकेच्या ऑडिशनला गेला आणि त्याची निवड झाली. पहिल्याच मालिकेच्या माध्यमातून सुबोध घराघरांत पोहोचला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. 


संबंधित बातम्या


Zee Studio : 'हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर झी स्टुडिओचा खुलासा; म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे..."