Hardeek Joshi Movie Club 52 : अभिनेता हार्दिक जोशीला (Hardeek Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचं टायटल पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते . आता 'क्लब 52' या सिनेमातील हार्दिकचा लूक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'क्लब 52' या सिनेमाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या 'क्लब 52' या सिनेमाच्या पोस्टरवर रावडी-रफटफ हार्दिक दिसून येत आहे. या सिनेमातील हार्दिकचा लूक खूपच लक्षवेधी आहे.
हार्दिकचा धमाकेदार लूक!
मोठ्या सोफ्यासारख्या खुर्चीत बसलेला हार्दिक, डोक्यातून वाहणारं रक्त आणि आजुबाजूला उडणारे पत्ते यातून कथानकाविषयीचे सूचक संकेत देण्यात आले आहेत. हार्दिकचा धमाकेदार लुक असलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता वाढली आहे. प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यानं हार्दिकला वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. येत्या 15 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'क्लब 52' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हार्दिक जोशीने 'क्लब 52' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"खेळातला माणूस बददला की खेळाची पद्धतही बदलते. 'कल्ब 52' ओपन होत आहे सगळ्यांसाठी..15 डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात". हार्दिक जोशीचं हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून लाडक्या राणादाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दमदार स्टारकास्ट असलेला 'क्लब 52'
हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी 'क्लब 52' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.
संबंधित बातम्या