Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आज (27 जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवले आणि गंभीर भूमिकाही केल्या. ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ सीरीज, ‘वाह ताज’ आणि ‘इक्बाल’ यांसारखे हिंदी आणि ‘सावरखेड एक गाव’, ‘पछाडलेला’ अशा मराठी चित्रपटातही काम केले.


श्रेयसने आपल्या करिअरमध्ये वाईट काळही पाहिला. मात्र, त्याला कोणत्याही चित्रपटातून तितके यश मिळाले नाही, जे त्याला त्याच्या पहिल्या ‘इकबाल’ या चित्रपटातून मिळाले. या चित्रपटाशी निगडीत एक किस्सा आहे, जो खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर, जाणून घेऊया…


पहिल्या हिंदी चित्रपटात साकारली दिव्यांग क्रिकेटरची भूमिका


अभिनेता श्रेयस तळपदेने ‘इकबाल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याने एका दिव्यांग क्रिकेटरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेता म्हणून श्रेयसचा हा पहिला हिंदी चित्रपट होता.


लग्नसोहळा रद्द कर! दिग्दर्शकाचा हुकुम


अभिनेता श्रेयस तळपदे याने एका मुलाखतीदरम्यान ‘इकबाल’चा किस्सा सांगितला होता. ‘इकबाल’चे शूटिंग सुरू होण्यापूर्वी, त्याने तीन दिवस सुट्टी मागितली होती. त्यावेळी दिग्दर्शक नागेशला वाटलं की, श्रेयस पार्टीसाठी रजा मागतोय. पण, जेव्हा त्याला कळलं की, श्रेयस लग्न करणार आहे, तेव्हा दिग्दर्शक नागेशने त्याला चक्क लग्न रद्द करायला सांगितलं. श्रेयसने या चित्रपटात किशोरवयीन मुलाची भूमिका साकारली होती. अशा परिस्थितीत तो विवाहित आहे हे प्रेक्षकांना कळणे योग्य नाही, असे त्यांना वाटत होते.


श्रेयसने काढली समजूत


यावर श्रेयसने त्याला सांगितले की, मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या आहेत. सगळी तयारी देखील झाली आहे, अशावेळी लग्न रद्द करणे शक्य होणार नाही. या लग्नाबद्दल मी कोणालाही सांगणार नाही आणि सर्व काही सिक्रेट ठेवेन. यानंतर दिग्दर्शकाने त्याला एक दिवसाची सुट्टी दिली.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha