Shabana Azmi  Birthday : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा आज (18 जानेवारी) वाढदिवस आहे. त्या आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शबाना आझमी यांनी 70 च्या दशकात आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर 80 आणि 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत होत्या.


अभिनेत्री शबाना आझमी जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी हैदराबाद येथे झाला. शबाना आझमी यांनी मुंबईतील क्वीन मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.


अभिनयाचे प्रशिक्षण घेतले!


शबाना आझमी यांनी 1973 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला. शबाना आझमी यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शबाना (Shabana Azmi) यांनी मोलकरणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. या चित्रपटाद्वारे शबाना आझमी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरल्या.


जावेद अख्तर यांच्याशी बांधली लग्नगाठ!


‘अंकुर’ या चित्रपटानंतर शबाना यांना एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट मिळाले. कारकीर्दीत यशाच्या शिखरावर असताना, अर्थात 1984च्या दरम्यान शबाना यांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी जावेद अख्तर, शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांच्याकडे लेखन कौशल्य शिकायला जायचे. यादरम्यान शबाना (Shabana Azmi) आणि जावेद अख्तर एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, शबानाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. याचे कारण म्हणजे जावेद अख्तर आधीच विवाहित होते. जावेद यांचे आधीच लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले देखील होती. मात्र, शबानाने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले. शबाना आझमी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शबाना आझमी या त्याकाळात बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून देखील ओळखल्या गेल्या.


एक-दोन नव्हे, तब्बल पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार


शबाना आझमी ‘अर्थ’, ‘निशांत’, ‘अंकुर’, ‘स्पर्श’, ‘मंडी’, ‘अनोखा बंधन’, ‘मृत्युदंड’, ‘मकड़ी’, ‘तहजीब’, ‘हनीमून ट्रॅवेल्स’, ‘जज्बा’, ‘नीरजा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत. उत्कृष्ट अभिनयासाठी शबाना आझमी (Shabana Azmi) यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना तब्बल पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ‘अंकुर’, ‘अर्थ’, ‘कंधार’, ‘पार’ आणि ‘गॉडमदर’ या चित्रपटांसाठी त्यांनी हे पुरस्कार पटकावले होते. शबाना यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. 1988 मध्ये त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. तर, तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ 2012मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला आहे.


हेही वाचा :


Shabana Azmi : 'जावेद अख्तरांपासून लांब रहा'; बोनी कपूर यांचा शबाना आझमींना सल्ला


कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्यावर शबाना आझमींचं प्रत्युत्तर