शबाना आझमी एका मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांना कंगना रनौतच्या देशद्रोही वक्तव्यावर प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या, जेव्हा देश एकत्र होऊन पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत दु:ख प्रकट करत आहे. हल्ल्याचा निषेध करत आहे, अशा वेळी वैयक्तिक हल्ल्याला काही महत्व आहे का? देव आपलं भलं करो, असं शबाना आझमी म्हणाल्या.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्याक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. मात्र पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी कार्यकम रद्द केला होता. यावरुन कंगनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.
जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही : कंगना रनौत
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर बोलताना कंगनाने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला होता. जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला होता. फिल्म इंडस्ट्री अशा देशद्रोही लोकांनी भरली आहे, असं ती म्हणाली होती.
नवज्योत सिंह सिद्धूंवरही निशाणा
माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असं म्हणाले होते. यावर कंगनाने नाव न घेता सिद्धूंवर निशाणा साधला. ती म्हणाली, जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत. असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे, अशा शब्दात तिने सिद्धूंच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.