Nana Patekar : उत्कृष्ट अभिनेते, साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आज वाढदिवस आहे. नानांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे. मातीशी नाळ जोडलेला 'आपला माणूस' अशी नानांची ओळख आहे.
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. त्यामुळे कलेचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं आहे. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स या महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
महाविद्यालयात असताना चित्रकलेसोबतच त्यांना रंगभूमीची आवड निर्माण झाली.
नाना नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकले. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज नाना पाटेकर यांचे जगभरात चाहते आहेत. हिंदी, मराठी, तामिळसह अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
नाना पाटेकर यांनी 1978 साली 'गमन' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण त्यांचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पहिलाच सिनेमा फ्लॉप झाल्याने त्यांना अनेक वर्षे संघर्षाचा सामना करावा लागला.
'या' सिनेमाने नानांना दिला पहिला ब्रेक
नानांना 1986 साली एन.चंद्रा यांच्या 'अंकुश' या सिनेमाने खरा ब्रेक दिला. या सिनेमात त्यांनी एका बेरोजगार तरुणाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांचा 1989 मध्ये 'परिंदा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 1992 साली प्रदर्शित झालेला नानांचा 'तिरंगा' हा सिनेमा सुपरहिट ठरला.
करिअरच्या सुरुवातीला नानांना गंभीर भूमिकेसाठी विचारणा होत होती. पण 2007 साली 'वेलकम' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी विनोदी भूमिकादेखील तितक्याच ताकदीने पेलली. त्यांनी 60 पेक्षा अधिक हिंदी सिनेमांत काम केलं आहे. त्यांना आतापर्यंत चारवेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नानांनी 'हमिदाबाईची कोठी' या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. 'माफीचा साक्षीदार' हा त्यांचा सिनेमा प्रचंड गाजला. अभिनयासह दिग्दर्शनाची धुरादेखील त्यांनी सांभाळली आहे. सिंहासन, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, आपला माणूस, नटसम्राट असे त्यांचे अनेक मराठी सिनेमे गाजले आहेत. नानांच्या नाम फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळी भागांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जात आहे.
संबंधित बातम्या