मुंबई: तिच्या सुरांची जादू अशी मोहिनी घालते की काही काळ तरी त्यातून बाहेर निघणं केवळ अशक्य. गाणं म्हणजे लता मंगेशकर, भारतीय रसिक प्रेक्षकांना गाण्याची ही परिभाषा ठाऊक झाली आहे. स्वरसम्राज्ञी या एकाच शब्दांत त्याचं वर्णन होऊ शकतं अशा भारतातील महान गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.

20 भारतीय भाषांत गाणी

भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' मिळवणाऱ्या या दुसऱ्या गायिका आहेत.  त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशकं रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या नावाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे.  चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आलं आहे. लतादीदींचा हा सांगितिक ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी समृद्ध आहे. आजवर 20 भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभरातील रसिकांवर या आवाजाची मोहिनी आहे.

घरातून संगीताचा वारसा

या थोरपणा पेक्षाही त्यांची जनी मानसी प्रतिमा आहे ती दीदी अशीच. लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929ला इंदोरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगितिक वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. दीनानाथांची थिएटर कंपनी होती. ते स्वत:ही उत्तम गायक होते. लतादीदींना वडिलांकडूनच संगीताचं प्रशिक्षण मिळालं. अमान अली खाँ साहेब आणि अमानत खान यांच्याकडेही लतादीदींनी संगीताचे धडे गिरवले. घरातून संगीताचा वारसा आणि गुरुकृपा यामुळे लतादीदींसारख्या हिऱ्याची झळाळी आणखी वाढली.

लतादीदी सिनेमात

पण 1942मध्ये वडिलांच्या निधनानंतर लतादीदींसाठी गाणं केवळ आवड न राहाता प्रपंचाची निकड बनली.  लतादीदींनी 1942 ते 48 मध्ये हिंदी आणि मराठी अशा आठ सिनेमात काम केलं.  लतादीदींनी काम केलेला पहिला चित्रपट होता नवयुगचा पहिली मंगळागौर हा. याच चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे गाणं गायलं. दीदींची गायनाची औपचारिक सुरुवात झाली ती किती हसाल या 1942 मध्ये आलेल्या चित्रपटाने. अर्थात यातलं दीदींनी गायलेलं गाणं वगळण्यात आलं होतं हा भाग वेगळा. पुढे दीदींनी आप की सेवा में या हिंदी सिनेमासाठी पार्श्वगायन केलं.

संगीतकारांनी नाकारलं

लतादीदी जेव्हा इंडस्ट्रीत आल्या तेव्हा नूरजहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली अशा पंजाबी आवाजांचं राज्य होतं. अशा काळात आवाज पातळ असं म्हणून संगीतकार त्यांना नाकारत होते.  संगीतकार गुलाम हैदर यांनी सुरुवातीला त्यांना संधी दिली नव्हती. मात्र 1949 मध्ये नियतीने लता मंगेशकर या नावाला एका झंझावाताचं रुप दिलं. बरसात, अंदाज, दुलारी आणि महल या सिनेमांसाठी दीदींनी गायलेली गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे. एस डी बर्मन, ओपी नय्यर, सी रामचंद्र, मदन मोहन अशा अनेक दिग्गज संगीताकारांसोबत लतादीदींनी भारतीय चित्रपटसंगीताचं विश्व गाजवलं. लतादीदींच्या हिंदी आणि मराठी गाण्यांनी भारतीय रसिकांना समृद्ध केलं. लतादीदींनी भारतीय जनमानसाचे कान घडवलेत असंच म्हणावं लागेल.

लतादीदींच्या 89व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझाकडून त्यांना अनेक शुभेच्छा.

संबंधित बातम्या

बर्थ डे स्पेशल : लतादीदींची 'टॉप-10' गाणी