Kajol Birthday : 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल (Kajol) आज (5 ऑगस्ट) तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. 1974मध्ये जन्मलेली काजोल ही एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने या इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मुळातच चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
काजोलचे वडील सोमू मुखर्जी दिग्दर्शक होते, तर आई तनुजा अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच काजोलचा कल चित्रपटांकडे वाढला. 1992मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत शूटिंग करेन आणि नंतर शाळेत पुन्हा परतेन, असा निर्धार करून तिने चित्रपट स्वीकारला. मात्र, या चित्रपटानंतर तिने शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ करिअर करण्यावर लक्ष केंद्रित केले.
काजोलचं खास मराठीशी कनेक्शन!
अनेकदा काजोल आपल्या चाहत्यांशी चक्क मराठीत संवाद साधताना दिसते. अर्थात तिचं मराठी भाषेशी खास कनेक्शन देखील आहे. काजोलची आई तनुजा मराठी, तर वडील बंगाली होते. काजोलची आजी शोभना समर्थ याही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यामुळे काजोलच्या घरात देखील मराठी भाषा बोलली जायची. याचमुळे तिला देखील बालपणापासून मराठी भाषेची गोडी निर्माण झाली होती.
घरातूनच मिळालं अभिनयाचं बाळकडू
काजोलची आई तनुजा एक अभिनेत्री आहेत. तिचे वडील शोमू मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते. काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी देखील अभिनेत्री आहे. काजोलची मावशी नूतन देखील एक अभिनेत्री होती. तिची आजी शोभा समर्थ आणि पणजी रतन बाई या दोघीही चित्रपटसृष्टीशी संबंधित होत्या. काजोलचे काका जॉय मुखर्जी आणि देब मुखर्जी दोघेही चित्रपट निर्माते होते, तर आजोबा सशधर मुखर्जी हे चित्रपट निर्माते होते. काजोलची भावंडं अर्थात राणी मुखर्जी, शरबानी मुखर्जी आणि मोहनीश बहल हे देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
चित्रपट कारकीर्द
काजोलने वयाच्या 16व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ‘बेखुदी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. मात्र, हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही. पण, तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. समीक्षकांनाही तिचा अभिनय खूप आवडला. यामुळे तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली. त्यानंतर 1993मध्ये काजोल ‘बाजीगर’ चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भुमिकेत होते. काजोलचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातील शाहरुख-काजोलची जोडी चांगलीच पसंत केली गेली.
1995मध्ये, काजोलचे ‘करण-अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे दोन चित्रपट बॅक टू बॅक हिट ठरले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. काजोलने तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले. ‘गुप्त’ चित्रपटात काजोल नकारात्मक भूमिकेत दिसली होती तिचे हे पात्रही लोकांना खूप आवडले होते. या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
अशी जमली अजय-काजोलची जोडी
अजय आणि काजोलची जोडी पहिल्यांदा 1995मध्ये आलेल्या 'हलचल' या चित्रपटात दिसली होती. याच चित्रपटातून या दोघांमधील जवळीक वाढल्याचे म्हटले जाते. त्याच वर्षी त्यांचा ‘गुंडाराज’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातून काजोल मोठी स्टार बनली होती. या चित्रपटादरम्यान अभिनेता शाहरुख खानसोबतही तिचे नाव जोडले जाऊ लागले होते. मात्र या अफवांना उडवून लावत, अजय आणि काजोल या जोडीने ‘प्यार तो होना ही था' या चित्रपटावेळी आपले एकमेकांवरील प्रेम जाहीर केले. 1999मध्ये या जोडीने मराठमोळ्या परंपरेनुसार लग्नगाठ बांधली.
हेही वाचा :
Kajol : 'मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं'; 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात काजोलनं सांगितले किस्से
Kajol : काजोलने मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट ; किंमत ऐकून डोळे विस्फारतील