Jackie Shroff Birtday : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) 1 फेब्रुवारी रोजी त्याचा 66वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे खरे नाव जय किशन काकूभाई श्रॉफ आहे. जवळपास 4 दशकांपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जॅकी श्रॉफने हिंदीशिवाय तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि पंजाबीसह इतर भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.


'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जॅकी श्रॉफच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. आजघडीला त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आणि प्रसिद्धी आहे. पण, एक काळ असा होता, जेव्हा तो मुंबईतील तीन बत्ती येथील चाळीत राहायचा. तेव्हाही जॅकी लोकांना खूप मदत करायचा आणि म्हणून लोक त्याला प्रेमाने ‘जग्गू दादा’ म्हणायचे.


‘अशी’ मिळाली मॉडेलिंगची ऑफर


कौटुंबिक परिस्थितीमुळे जॅकी श्रॉफने आपले शिक्षण अर्धवट सोडले. अकरावीपर्यंत शिकून नोकरी करायला लागला. त्याला स्वयंपाकाची आवड होती, म्हणून एक दिवशी तो कामासाठी ताज हॉटेलमध्ये पोहोचला, पण त्याला तिथेही काही काम मिळाले नाही. एकदा तो बस स्टँडवर उभा असताना, त्याची उंची पाहून एका व्यक्तीने मॉडेलिंगची ऑफर दिली. तेव्हा, जॅकी श्रॉफला याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यासाठी पैसे मिळतील का, इतकीच विचारणा त्याने केली आणि अशा प्रकारे त्याच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात झाली.


पहिल्याच चित्रपटातून बनला सुपरस्टार


कठोर परिश्रमानंतर जॅकी श्रॉफला सुभाष घई यांच्या 'हीरो' चित्रपटात पहिली संधी मिळाली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यानंतर जॅकी श्रॉफने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या वडिलांबद्दल बोलताना टायगर श्रॉफने म्हटले की, 'पहिल्या चित्रपटानंतर माझे वडील रातोरात सुपरस्टार झाले. त्यानंतरही 5 ते 6 वर्षे ते चाळीतच राहिले. चाळीत राहणाऱ्या सर्वांसाठी एकच स्नानगृह होते आणि सकाळी प्रत्येकाला रांगेत थांबण्याचे एकच काम होते. या सगळ्यात त्यांनी दिवस काढले आहेत’


जॅकी श्रॉफच्या करिअरमधील हिट चित्रपटांमध्ये 'सौदागर', 'राम लखन', 'त्रिदेव', 'परिंदा', 'बॉर्डर', 'रंगीला', 'अग्निसाक्षी', 'खलनायक' आणि 'शपथ' यांचा समावेश आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha