Akshay Kumar Birthday : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आज 55वा वाढदिवस. अभिनेता अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. अक्षयचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने आपले नाव बदलून अक्षय ठेवले. अक्षयचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाल्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. अक्षयला लहानपणापासूनच कराटे शिकण्याची आवड होती. त्याने आठवीपासून मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली होती. मेहनतीच्या जोरावर त्याने ‘ब्लॅकबेल्ट’ देखील पटकावला.


यानंतर तो मार्शल आर्टचे पुढील शिक्षण घेण्यासाठी बँकॉकला गेला. तिथेही त्याने मार्शल आर्टचा अभ्यास सुरू ठेवला आणि थायलंडमधील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान तो एका हॉटेलमध्ये वेटरचं काम देखील करत होता. तर, फावल्या वेळात मुलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील देत होता. यातील एका मुलाने अक्षय कुमारला (Akshay Kumar) गंमतीत मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. अक्षयने देखील यावर विचार केला आणि स्वतःचे फोटोशूट करून घेतले. या कामासाठी त्याला एकरकमी पाच हजार रुपये मिळाले. थोड्यावेळाच्या कामासाठी इतके पैसे मिळाले, हे बघून त्यालाही आनंद झाला होता. यानंतर त्याला नॅशनल जिओग्राफिकवर प्रसारित होणार्‍या मार्शल आर्ट्सवर आधारित 'सेव्हन डेडली' या माहितीपटात काम करण्याची संधी मिळाली.


बॉलिवूडमध्ये एन्ट्री!


अभिनेता म्हणून अक्षय कुमारचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट 'सौगंध' होता, जो 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटापूर्वी अक्षय कुमार दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या ‘आज’ या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसला होता. मात्र, अक्षयचा 'सौगंध' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवू शकला नाही. मात्र, 1992मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडी’ चित्रपटाच्या यशाने अक्षयला प्रेक्षकांच्या मनात एका विशेष जागा मिळवून दिली. याच चित्रपटानंतर अक्षय कुमारला ‘खिलाडी’ हे नाव पडले. या यशानंतर अक्षयने कधीच मागे वळून पाहिले नाही.


‘पद्मश्री’ने सन्मान!


'खिलाडी', 'मोहरा', 'धडकन', 'अजनबी', 'मुझसे शादी करोगी', 'हेरा फेरी', 'गरम मसाला', ‘भूल भुलैया’, ‘सिंग इज किंग’, ‘गरम मसाला’, ‘स्पेशल 26’, ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘केसरी’ यांसारख्या चित्रपटांमुळे विशेष ओळखला जातो. चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी त्याला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मनोरंजन विश्वातील योगदानाबद्दल अक्षय कुमारला 2009मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा :


Akshay Kumar, Kapil Sharma : अक्षय कुमारने फ्लॉप चित्रपटांचं खापर फोडलं कपिल शर्मावर! म्हणाला ‘याच्यामुळे माझे चित्रपट...’


Cuttputlli Review : शहरात घडणाऱ्या क्रूर घटनांचा छडा लावण्यासाठी अक्षय कुमार पुन्हा एकदा खाकी वेशात! कसा आहे ‘कटपुतली’?