HanuMan OTT Release :  अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) याची प्रमुख भूमिका असलेला 'हनुमान' (Hanuman Movie) यंदाच्या  2024 मधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तिकिटबारीवर चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.  'हनुमान'चा बोलबाला कायम असून ओटीटीवरही दमदार प्रतिसाद मिळत आहे. आता आणखी एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट झळकणार आहे. 


हिंदी भाषेतील हनुमान चित्रपट हा जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. हिंदीत आतापर्यंत लाखो लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. तर, चित्रपटाचा तेलगु व्हर्जन हा झी 5 ओटीटीवर प्रदर्शित झाला. हिंदी आणि तेलगू भाषेत चित्रपटात प्रदर्शित केल्यानंतर इतर भाषेतही या चित्रपटाची मागणी वाढली. आता, हा चित्रपट तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 


कोणत्या ओटीटीवर होणार रिलीज?


हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीजसाठी सज्ज आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 






बॉक्स ऑफिसवर केली कमाल


हनुमान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने हिंदी भाषेतच 52.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 200.32 कोटी रुपये होते. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. हनुमानसोबत इतरही दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामध्ये महेश बाबूचा 'गुंटूर करम', धनुषचा 'कॅप्टन मिलर', शिवकार्तिकेयचा 'आयलान' आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांना मागे टाकत 'हनुमान' हा आतापर्यंत 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.