Hamare Baarah Movie Release News :  वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'हमारे बारह' (Hamare Baarah Movie) चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद हटवणार असल्याची हमी निर्मात्यांनी दिल्यानंतर रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डानं नेमलेली समिती चित्रपटाबाबतची अहवाल वेळेत देण्यात अपयशी ठरली. मात्र समितीच्या अपयशामुळे चित्रपट प्रदर्शन रोखू शकत नाही असे मुंबई हायकोर्टाने म्हटले. 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात एका व्यक्तीसाठी सिनेनाचं प्रदर्शन रोखता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले. 


'हमारे बारह' या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता.  चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर वाद निर्माण झाला. काही विशिष्ट लोकांमुळे देशाच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. तसेच 'लवकरच चीनला मागे टाकू' असे पोस्टरवर लिहिण्यात आल्याचा आक्षेप दाखवण्यात आला. 'हम दो हमारे बारह' या सिनेमात अन्नू कपूर आणि मनोज जोशी आणि अश्विनी काळसेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटातील कलाकारांना, क्रूला धमक्या मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या चित्रपटातून मुस्लिम महिला आणि समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप करत अझहर तांबोळी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.  


मुंबई हायकोर्टाने या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती दिली होती. गुरुवारी, हायकोर्टात झालेल्या सुनावणीत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवून सर्व शोमध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  संपूर्ण देशभरात आक्षेपार्ह संवाद वगळूनच चित्रपट प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक शोच्या सुरुवातीला सेन्सॉर बोर्डच्या सुधारित प्रमाणपत्राची माहिती द्यावी लागणार आहे. चित्रपटाविरोधात याचिकेवर 13  जूनला नियमित खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे. बुधवारी हायकोर्टानं सिनेनाच्या रिलिजला स्थगिती दिली होती. मात्र निर्मात्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान टाळण्याकरता सीबीएफएफसीच्या प्रमाणपत्रामुळे स्थगिती हटवण्यात आली आहे. काही राज्यांचा अपवाद वगळता चित्रपट आज देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.