Guru Dutt Birth Anniversary :  भारतीय सिनेसृष्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. या कलाकारांच्या कलाकृती आजही लोकप्रिय आहेत. 'प्रभात'पासून सिनेइंडस्ट्रीत पाय ठेवणारे दिग्दर्शक, अभिनेते गुरुदत्त (Guru Dutt) यांनी आपल्या अल्प सिनेकारकिर्दीत काही क्लासिक चित्रपट तयार केले. गुरुदत्त यांनी आपल्या वयाच्या 39 व्या वर्षी आत्महत्या करत जीवन संपवले. मात्र, त्यांनी तयार केलेल्या कलाकृती आजही अमर आहे. 
 
गुरुदत्त यांचे खरे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण  होते. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनात पारंगत असलेले गुरु दत्त यांचे चित्रपट आजही सिनेसृष्टीतील विद्यार्थ्यांसाठी उदाहरण आणि प्रेरणा आहेत. 9 जुलै 1925 रोजी कर्नाटकात जन्मलेल्या गुरु दत्त यांचे बालपण कोलकात्यात गेले, पण नशिबाने त्यांना पुणे नंतर मुंबईत नेले. गुरु दत्त यांना प्रभात फिल्म कंपनीने कोरिओग्राफर म्हणून नियुक्त केले होते परंतु लवकरच त्यांना अभिनेता म्हणून काम करण्यास भाग पाडले गेले. इतकंच नाही तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली. 


 प्रभात बंद पडल्यावर गुरुदत्त मुंबईत आले. देव आनंद यांनी गुरुदत्त यांना बाजी या आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली होती. 1951 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर मात्र, गुरुदत्त यांना चित्रपटसृष्टीत यश मिळाले. 


गुरुदत्त यांचे मास्टरपीस समजले जाणारे चित्रपट आजही पाहता येतील. गुरुदत्त यांचे चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत. 


मिस्टर अॅण्ड मिसेस 55 (1955)


1955 मध्ये रिलीज झालेला 'मिस्टर अॅण्ड मिसेस 55' हा चित्रपट गुरुदत्त यांची रोमँटिक बाजू दाखवतो. गुरुदत्त यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात मधुबालाही झळकली होती. त्याशिवाय, जॉनी वॉकर, ललिता पवार सारखे कलाकार झळकले होते. 


कुठं पाहता येतील? हा चित्रपट प्राईम व्हिडीओ अथवा युट्युबवर पाहू शकता. 


प्यासा (1957)


भारतातच नाही तर परदेशातही 'प्यासा'ने आपली छाप सोडली. गुरुदत्त दिग्दर्शित आणि मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पोचपावती मिळाली. जगातील कडवट सत्य गुरुदत्त यांनी पडद्यावर उतरवले होते. यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. 


एक कवी, ज्याच्या कलेची तो जिवंतपणी कोणी कदर करत नाही, पण त्याच्या मृत्यूनंतर सर्वजण त्याला महान कलाकार म्हणतात. या चित्रपटात गुरु दत्त, वहिदा रहमान, रहमान आणि माला सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट रोमँटिक ट्रॅजिक चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाला स्थान देण्यात आले आहे.


कुठं पाहता येईल? हा चित्रपट जिओ सिनेमा, अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल. 



कागज के फूल (1959)


गुरुदत्त यांचा हा चित्रपट आजही मास्टरपीस समजला जातो. चित्रपट रिलीज झाला तेव्हा या चित्रपटाला फ्लॉप चित्रपटाचा शिक्का लागला. बॉक्स ऑफिसवर कमाई केली नसली तरी हा चित्रपट काळाच्या पुढच्या चित्रपट ठरला. या चित्रपटात गुरू दत्त यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाची कथा दाखवली आहे. हा चित्रपट काही प्रमाणात गुरु दत्त यांच्या खऱ्या आयुष्याचा आरसा होता असे मानले जाते.


कुठं पाहता येईल? हा चित्रपट एमएक्स प्लेअर, प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. 



चौदहवीं का चाँद (1960)


'कागज के फूल'च्या अपयशानंतर गुरु दत्तला हिट आणि कमबॅकची खूप गरज होती. यावेळी तो अभिनेता म्हणून पुढे आला. या चित्रपटात लखनौच्या दोन मित्रांची कहाणी आहे जी एकाच मुलीच्या (वहिदा रहमान) प्रेमात पडतात. हा चित्रपट त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक ठरला आणि गुरु दत्तच्या ढासळत्या कारकिर्दीसाठी तो मैलाचा दगड ठरला.


कुठं पाहता येईल? हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल. 


साहिब बीवी और गुलाम (1962)



या चित्रपटात गुरु दत्त मुख्य भूमिकेत दिसला होता. बिमल मित्रा यांच्या 'साहेब बीबी गोलम' या बंगाली कादंबरीवर हा चित्रपट आधारीत होता. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असल्याने त्या काळासाठी ही एक धाडसी कथा होती. गुरुदत्त यांच्या कारकिर्दीतील हा एक यशस्वी चित्रपट होता.


कुठं पाहता येईल? हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल. 


या चित्रपटांशिवाय, 'बाजी', 'आर-पार', 'सीआयडी' आदी चित्रपटही गाजले.