मुंबई : अवास्तव दावे करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करणं आता ब्रँड अँबेसेडर्सच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण अशा फसव्या जाहिरातींमध्ये सहभाग आढळल्यास सेलिब्रेटींनाही कैद आणि दंड ठोठावला जाऊ शकतो. त्यासंदर्भातील विधेयक आणण्याची तयारी सुरु आहे.

 
पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंतची कैद आणि 10 लाख रुपयांचा दंड, तर दुसऱ्यांदा असाच गुन्हा केल्यास संबंधित सेलिब्रिटीला पाच वर्षांपर्यंतची कैद आणि 50 लाख रुपये दंड सुनावला जाऊ शकतो. त्यासंदर्भातील तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

 
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून मंत्रिमंडळासाठी टिप्पणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसंच यात निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी सेलेब्रिटी ब्रँड अँबेसेडरवरच असणार आहे. तसंच उत्पादक आणि सेवा पुरवठादार यांनाही खोट्या आणि भ्रामक जाहिरातींसाठी कायदेशीररित्या जबाबदार ठरवण्यात येणार आहे.