Ghar Banduk Biryani : 'घर बंदुक बिर्याणी' (Ghar Banduk Biryani) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 


'घर बंदुक बिर्याणी' या सिनेमाची निर्मिती नागराज मंजुळे (Nagraj Manjule) करत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जंगल अवताडेने सांभाळली आहे. या सिनेमात नागराज मंजुळे दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यासोबत या सिनेमात अभिनयदेखील केला आहे. 


सयाजी शिंदे (Sayaji Shinde), आकाश ठोसर (Akash Thosar) आणि नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका असलेला 'घर बंदुक बिर्याणी' हा सिनेमा येत्या नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकाचवेळी हा सिनेमा मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 






नागराज मंजुळे नेहमीच काहीतरी भन्नाट विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याआधी त्यांनी  फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. आता 'घर बंदुक बिर्याणी' हा एक वेगळा विषय ते प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. 


'घर बंदुक बिर्याणी' या सिनेमाबद्दल नागराज मंजुळे म्हणाले,"घर बंदुक बिर्याणी' या सिनेमाचे शूटिंग संपले असून एका बाजूला काम पूर्ण झाल्याचे समाधानही आहे आणि इतके दिवस एकत्र राहिल्याने थोडा भावनिकही झालो आहे. यात मी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. सयाजी शिंदे सारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करताना मजा आली. आकाशसोबत मी याआधीही काम केले असून तो एक उत्तम कलाकार आहे. एखादी भूमिका साकारताना तो त्यात स्वतःला झोकून देतो. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच आम्ही प्रदर्शनाची तारीखही जाहीर करू".


संबंधित बातम्या


Naal 2 : नागराज मंजुळेंचा ‘नाळ 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा!