Ghar Banduk Biryaniघर बंदूक बिरयानी (Ghar Banduk Biryani) या नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर हा मराठी सिनेमा जगभरातील प्रेक्षकांसाठी 19 मे 2023 पासून फक्त झी5 वर स्ट्रीम केला जात आहे. झी स्टुडिओज आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेल्या घर बंदूक बिरयानी या सिनेमातून दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी पर्दापण केलं आहे.


घर बंदुक बिरयानी या चित्रपटाचं कथानक बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या कोलागडमध्ये घडलेल्या काल्पनिक कथेवर आधारित आहे.या कथेमध्ये  दाखवण्यात आलं आहे की, कमांडर पल्लम (सयाजी शिंदे) आणि त्यांचे बंडखोर जंगलात लपून तिथल्या आमदाराचा बदला घेण्याचा कट रचत असतात. जवळच्याच गावात राजू (आकाश ठोसर) त्याची भावी पत्नी लक्ष्मीला (सायली पाटील) भेटणार असतो. लग्नासाठी तिच्या वडिलांची एकच अट असते आणि ती म्हणजे, मुलाकडे स्वतःचं घर हवं. गावातल्याच एका ढाब्यावर काम करणाऱ्या राजूसाठी सगळ्यात चवदार बिरयानी बनवणं एकवेळ सोपं असतं, पण घर घेणं तितकंच अवघड असतं. 






झी5 चे प्रमुख व्यवसाय अधिकारी मनीष कालरा म्हणाले, ‘त्या-त्या प्रांतातल्या भाषेत वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यावर झी5चा भर आहे. मराठी प्रेक्षक असे सिनेमे पसंत करत आहेत. झोंबिविली, धर्मवीर आणि वाळवीच्या यशानंतर घर बंदूक बिरयानी हा आणखी एक अनोखा सिनेमा आणताना आम्हाला आनंद होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही तिसऱ्यांदा नागराज मंजुळे यांच्याबरोबर काम करत आहोत. यापूर्वी त्यांच्या सैराट व झुंड या सिनेमांनी आमच्या प्लॅटफॉर्मवर चांगले यश मिळवले आहे. झी5 वर घर बंदूक बिरयानीच्या जागतिक वर्ल्ड प्रीमियरसाठी आम्ही उत्सुक आहोत. अनोखी गोष्ट आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल याची खात्री वाटते.’


इतर महत्वाच्या बातम्या:


Ghar Banduk Biryani Review: डॅशिंग राया पाटील, खतरनाक पल्लम आणि आचारी राजूची भन्नाट गोष्ट, कसा आहे 'घर बंदूक बिरयानी' ? वाचा रिव्ह्यू