Ghar Banduk Biryani Review: मराठी चित्रपटसृष्टी ही मायबाप  रसिकांच्या मनोरंजनासाठी नेहमी सज्ज असते. कधी भावनिक तर काही सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. पण मराठी चित्रपटात अॅक्शनचा तडका नाही अशी तक्रार करणाऱ्यांना आता नागराज मंजुळेनं (Nagraj Manjule)  त्याच्या स्टाईलनं उत्तर दिलंय.  नुस्ता राडा, फायटिंग आणि कडक डायलॉग्सपासून नागराजनं तयार केलेली ही 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani Review) नावाची झणझणीत बिर्याणी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे चोचले नक्कीच पूर्ण करते.

  


डॅशिंग राया, एका टोळीचा म्होरक्या पल्लम आणि आचारी राजू या तिघांच्या आवती-भोवती 'घर बंदूक बिरयानी' ची कथा फिरते. कोलागडच्या घनदाट जंगलाची सफर करता-करता राया, पल्लम आणि राजू यांच्या गोष्टीत आपण शिरतो. कथेची सुरवात कोलागड येथील जंगलात असलेल्या एका टोळीपासून होते . या टोळीचा म्होरक्या  पल्लम असतो. या टोळीवर पोलीस गोळीबार करतात. या गोळीबारात पल्लमची प्रेयसी मारियाचा मृत्यू होतो. मारियाच्या मृत्यूनंतर पल्लम तिच्या आठवणीत भावूक होतो. मारिया ही चविष्ट बिर्याणी बनवत असते. मारियाच्या मृत्यूनंतर बिर्याणी कोण बनवणार? असा प्रश्न पल्लम आणि त्याच्या टोळीला पडतो.


पल्लमच्या कथेनंतर आपल्याला आचारी राजूची देखील स्टोरी कळते. गावात सगळ्यात चविष्ट बिर्याणी राजू बनवत असतो. राजू हा एका ढाब्यामध्ये काम करत असलेला एक अनाथ मुलगा असतो. राजूच्या आयुष्यात लक्ष्मी नावाच्या एका मुलीची एन्ट्री होते. लक्ष्मी आणि राजू यांना लग्न करायचे असते पण लक्ष्मीच्या बापाची एक अट असते. ती अट म्हणजे राजूकडे स्वतःचं घर असावं. पण राजूकडे स्वत:चे घर नसतं. 


राजूची लव्हस्टोरी कळताच या चित्रपट एन्ट्री होते राया पाटील नावाच्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची. पिळदार मिश्या, डोळ्यावर गॉगल आणि भेदक नजर  असा असणारा राया हा एका फटक्यात टवाळकी करणाऱ्यांना गार करत असतो. रायाची फायटिंग, रायाचे डायलॉग... व्वा... धुरळा नुस्ता.... रायाची भावनिक बाजू म्हणजे त्याचं कुटुंब. कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी ठेवणाऱ्या रायाची बदली कोलागड येथे होते, जिथे पल्लम आणि त्याची टोळी धुमाकूळ घालत असते. 


आता पल्लम आणि त्याच्या टोळीला राया कशा प्रकारे हँडल करतो? यात आचारी असणारा राजू कसा तडका टाकतो, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला घर बंदूक बिरयानी हा चित्रपट बघावा लागेल. 'हे फक्त नागराज आणि त्याची टीमचं शकते' हे वाक्य चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर जाताना तुमच्या तोंडून नक्कीच निघेल असं मला वाटतं.


चित्रपटातील राया पाटील हा नक्कीच तुमच्या मनावर छाप पाडेल. नागराज मंजुळेनं साकारलेला रायाचा हटके अंदाज तुम्हाला नक्कीच आवडेल. नेहमी चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक विषय मांडणारा दिग्दर्शक अशी नागराजची इमेज लोकांच्या मनात होती. पण नागराजनं  'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटामधून लोकांच्या मनात असलेली त्याची ही इमेज पूर्णपणे बददली आहे, असं म्हणता येईल. हा चित्रपट पाहिल्यानंतर सिंघम, सिंम्बा यांना विसरुन आपण राया पाटील या भूमिकेच्या प्रेमात पडतो, असं म्हणता येईल. 


तसेच सयाजी शिंदे यांनी साकरलेला पल्लम आणि आकाश ठोसरनं साकारलेला राजू  हे देखील तुमची मनं जिंकतील. चित्रपटाबद्दल फार काही सांगणं चुकीचे ठरेल. जसं बिर्याणीच्या चवीबद्दल गप्पा मारण्यापेक्षा ती स्वत: खाऊन ढेकर देणं योग्य आहे. तसंच  चित्रपटाबद्दल फार काही सांगण्यापेक्षा हा चित्रपट बघूनच अनुभवायचा आहे.