मुंबई : संजय बारु यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' या पुस्तकावर आधारित चित्रपट येत आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या भूमिकेचं कास्टिंग करण्यात आलं आहे. सुजैन बर्नेट ही जर्मन अभिनेत्री सोनिया गांधींची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सुजैनने यापूर्वी अनेक मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ईटीव्ही मराठीवरील कालाय तस्मै नमः, ढोलकीच्या तालावर, झी मराठीवरील उंच माझा झोका या मालिकांमध्ये सुजैन झळकली होती. विशेष म्हणजे सुजैनला चांगलं हिंदी बोलता येतं.

'एबीपी न्यूज'च्या 7RCR या शोमध्ये सुजैनने सोनिया गांधींचीच व्यक्तिरेखा साकारली होती. कसौटी जिंदगी की, ऐसा देस है मेरा, झांसी की रानी, ये रिश्ता क्या कहलाता है यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.



या भूमिकेसाठी एका इटालियन अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. मात्र सुजैन बर्नेटच्या ऑडिशननंतर तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. या चित्रपटात अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत.

सुजैन बर्नेट फक्त सोनिया गांधींसारखी दिसतच नाही, तर तिची संवादफेकही अत्यंत मिळती-जुळती आहे, असं निर्माते सुनील बोहरा यांनी म्हटलं. बोहरा यांनी 'शाहिद' आणि 'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

संजय बारु यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. संजय बारु मे 2004 ते ऑगस्ट 2008 पर्यंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार होते. 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका गांधींच्या भूमिकेसाठी दोघांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. या चित्रपटात 140 हून जास्त कलाकार असणार आहेत. एपीजे अब्दुल कलाम, लालू प्रसाद, विनोद मेहता, सीताराम येचुरी, ए राजा, सुषमा स्वराज, अमर सिंह, कपिल सिब्बल, ज्योती बसू, प्रणब मुखर्जी, नटवर सिंह, पीव्ही नरसिम्हा राव, अजिथ पिल्लई, शिवराज पाटील, अर्जुन सिंह, उमा भारती आणि मायावती अशी अनेक राजकीय व्यक्तिमत्त्वं पाहायला मिळणार आहेत.

मे महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होणार आहे. 21 डिसेंबर 2018 रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाचा 90 टक्के भाग लंडनमध्ये शूट होत आहे.