सलमान-कतरिनाच्या कथित ब्रेकअपचा डेझीच्या करिअरला फायदा
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2018 12:37 PM (IST)
सलमान आणि कतरिनाच्या गोड नात्याची अखेर होण्यापूर्वी झालेल्या एका भांडणामुळे डेझीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांचं रिलेशनशीप आणि ब्रेकअप हे जणू ओपन सिक्रेट आहे. सलमान-कतरिनाच्या ब्रेकअपचा दोघांच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला, हे माहिती नाही, मात्र त्याचा फायदा अभिनेत्री डेझी शाहला झाला आहे. सलमानने डेझी शाहला 'जय हो' चित्रपटातून लाँच केलं. डेझीला हा मोठा ब्रेक मिळण्यासाठी खुद्द कतरिना कारणीभूत आहे. 'स्पॉटबॉय' या वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये हा उल्लेख आहे. सलमान आणि कतरिना यांनी आपली (कथित) रिलेशनशीप आणि (अर्थात कथित) ब्रेकअप विषयी कधीच वाच्यता केली नाही. दोघं सध्याही चांगले मित्र आहेत. मात्र त्यांच्यातील गोड नात्याची अखेर होण्यापूर्वी झालेल्या एका भांडणामुळे डेझीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सलमान आणि कतरिनाचं भांडण सुरु होतं. माझ्यामुळे तुझं नाव घराघरात पोहचलं, असा टोला सलमानने लगावला. त्यावर कतरिना चिडली. मी तुझं श्रेय नाकारत नाही, मात्र माझ्या टॅलेंटच्या जोरावर नाव कमावलं आहे, असं कतरिनाने सुनावलं. 'जर तुझ्या जोरावर मी यश कमवलं, असं तुला वाटत असेल, तर कोणालाही उचल आणि स्टार बनवून दाखव' असं चॅलेंज कतरिनाने दिलं. सलमाननेही विडा उचलला. एका बॅकग्राऊण्ड डान्सरला स्टार करुन दाखवतो, असं म्हणत त्याने आव्हान स्वीकारलं. गणेश आचार्यच्या ट्रूपमधील डेझीला सलमानने उचललं आणि तिचं ग्रूमिंग करुन 'जय हो'मध्ये झळकवलं. अर्थात ही पैज कतरिनाने जिंकली असं म्हणायला हरकत नाही. डेझीचं दणक्यात पदार्पण झालं खरं, मात्र चार वर्षांत तिला बॉलिवूडमध्ये स्थान कमवता आलं नाही.