Jui Gadkari On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पा हा सर्वांसाठी खूप जवळचा असतो. 'गणशोत्सव' (Ganeshotsav 2023) हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वच मंडळी बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीदेखील आतुर आहेत. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) बाप्पासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 


एबीपी माझाशी बोलताना जुई गडकरी म्हणाली,"गणपती बाप्पा हा सर्वांसाठी खूप जवळचा असतो. त्याला आपण अरे-तुरे करतो इतका तो आपल्या जवळचा असतो. लहानपणापासून देवाकडे काहीतरी मागायची आपल्याला सवय असते. त्यातही गणपती बाप्पा असेल तर आपण स्पेशल गोष्टी मागतो. मी दरवर्षी बाप्पाकडे मागत गेले  आणि तो मला देत गेला आहे. एक वर्षी बाप्पाकडे मागितलेली एखादी गोष्ट पुढच्या वर्षी बाप्पा येईपर्यंत पूर्ण झालेली असते. पण हल्ली मी त्याच्याकडे काही मागत नाही. फक्त मी त्याचे आभार मानते. माझ्या मनातल्या गोष्टी बाप्पा ओळखतो. आमच्या घरी दीड दिवसांचा नवसाचा गणपती येतो. आमच्या बाप्पाला आता 150 वर्षे झाली आहेत". 



'त्या'वेळी मला वाटलं बाप्पा माझ्या पाठीशी : जुई गडकरी


बाप्पाबद्दल बोलताना जुई गडकरी म्हणाली,"आमच्या घरातला मी खूप उत्साही प्राणी आहे. बाप्पासाठी मोदक, सजावट करायला मला आवडतं. पण आजारपणात मला काहीच करता येत नव्हतं. तब्येत साथ देत नव्हती. त्यामुळे मी बाप्पाला सांगितलं होतं, तुला जर माझ्या हातचं हवं असेल तर तू मला उभं करशील? त्यानंतर बाप्पाने माझं ऐकलं आणि मी बाप्पासाठी मोदक-नैवेद्य बनवला. मनात आलेल्या गोष्टी बाप्पाला कळतात. बाप्पावर माझा खूप विश्वास आहे". 


जुई गडकरी पुढे म्हणाली,"प्रत्येक गणेशोत्सव हा खूप खास असतो. पण बाप्पासोबतची एक आठवण मी कधीही विसरू शकत नाही. कर्जतला आमचं एकत्र कुटुंब आहे. संपूर्ण कुटुंबीय एकत्र येऊन आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो. पण 2014 साली आजीची प्रकृती खालावली होती. तिचं ऑपरेशन झालेलं असताना ती स्वत:हून दुसऱ्या मजल्यावर गणपतीचं दर्शन घ्यायला आली. त्यावेळी ती खूप छान दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज होतं. कधीही दिसली नव्हती इतकी सुंदर ती दिसत होती. पण बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आजीला स्ट्रोक आला आणि सहा महिन्यांसाठी ती कोमात गेली आणि त्यानंतर ती परत आलीच नाही. आजीचे ते फोटो आम्ही आजही पाहतो". 



...त्यामुळे बाप्पा कायम आपल्या जवळ आहे असं वाटतं : जुई गडकरी


जुई गडकरी म्हणतेय,"माझ्यासह घरातील सर्वच मंडळी खूप उत्साही आहेत. आता बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असून स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आमचा बाप्पा हा शाडूच्या मातीचा असतो. तसेच आमच्या घरच्या विहिरीतच बाप्पाचं विसर्जन होतं. बास्केटचा पाळणा बनवून त्याला विहिरीत सोडलं जातं. त्यामुळे बाप्पा कायम आपल्या जवळ आहे असं वाटतं. कापडी फुलं, लाकडाचा वापर करून पर्यावरणपूरक आरास बनवण्यावर आमचा भर असतो". 


संबंधित बातम्या


Ankita Walawalkar : राजकारण प्रवेशाच्या चर्चांना उधाण; कोकण हार्टेड गर्ल म्हणतेय,"बाप्पालाच जाऊन विचारणार"