Kokan Hearted Girl Ankita Walawalkar ON Kalavantancha Ganesh : सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Walawalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या 'कोकण हार्टेड गर्ल'साठी (Kokan Hearted Girl) तिचा बाप्पा (Ganapati Bappa) खूप खास आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अंकिता बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. 


बाप्पाबद्दल एबीपी माझाशी बोलताना (Kalavantancha Ganesh) कोकणची लेक अर्थात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर म्हणाली," देवासोबत सर्वांचं जसं नातं असतं अगदी तसचं माझं आहे. कोकणकन्या असल्यामुळे मला गणेशोत्साबद्दल फार आतुरता असते. बाप्पासोबत माझं खूप खास नातं आहे. आमच्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. तसेच गौरी पूजनही केलं जातं. माझ्या पंजोबांच्याही आधीपासून आमच्या घरी गणपती येत आहेत". 


कोकण हार्टेड गर्लच्या आठवणीतला गणेशोत्सव कोणता?


आठवणीतल्या गणेशोत्सवाबद्दल बोलताना अंकिता म्हणाली,"कोरोनाकाळात मी मुंबईत होते. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मला घरी जाता आलं नाही. घरी गणपतीला नव्हते असं माझं ते पहिलच वर्ष होतं.
एकही दिवस घरी जाता आलं नसल्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं. त्यावेळी माझ्या एका मित्राने मुंबईत गणपतीची कार्यशाळा सुरू केली होती. तिथे जाऊन मी म्हटलं होतं की, पुढच्या वर्षी मी कार घेईन आणि या कार्य शाळेतून बाप्पा घेऊन घरी जाईल. 


अंकिता पुढे म्हणाली,"त्यानंतर एक वर्षात काय झालं हे मलाही कळत नाही. मी कार घेतली आणि त्या शाळेतला शाडू मातीचा गणपती घेऊन घरी गेले. पण आमच्या गावी एक प्रथा आहे की जिथून दरवर्षी गणपती घेतो तिथूनच घ्यावा लागतो. मी मुंबईत घेतलेली बाप्पाची मूर्ती छोटी होती पण ती माझ्या कारमधून घेऊन घरी गेले होते. तेव्हा देव आहे असं मला कुठेतरी जाणवलं. आपण मनापासून मागतो ते पूर्ण होतचं". 



बाप्पाच्या आठवणीत रमलेली अंकिता म्हणाली,"बाप्पाची आरास बनवताना सजावटीदरम्यान आमच्या घरी नेहमीच भांडण होत असतं. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी सजावट हा खूप जिवाभावाचा विषय आहे.  गिरगाव ध्वजपथकामध्ये मी ढोलवादन करते. गणपतीच्या आगमनाला मी मुंबईत ढोलवादन करते. मुंबईतले गणपती कसे असतात हे मला अनुभवायचे होते त्यामुळे एक वर्ष मी खास मुंबईत राहुन गणेशोत्सव अनुभवला आहे". 


अंकिता पुढे म्हणाली,"मुंबईत डीजेवगैरे या गोष्टी मोठ्या प्रमाणात असतात. गावी शांततेत हा उत्सव साजरा केला जातो. पण आता गावांमध्येही डीजेची क्रेझ यायला लागली आहे. आमच्याकडे काळोख होण्याआधी गणपतीचं विसर्जन होतं. पण मुंबईत मात्र दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू असतं. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. गावी खूप शांततेत हा उत्सव साजरा केला जातो. इथे डीजे वाजतात गावी भजनांचा आवाज येतो". 


अंकिता वालावलकर बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सजावटीच्या तयारीला तिने आता सुरुवात केली आहे. कोकण हार्टेड गर्ल राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. याबद्दल बोलताना ती म्हणाली,"मी आता बाप्पालाच जाऊन विचारणार आहे की, त्याच्या मनात काय आणि मग ठरवेल. मी फक्त मनसेच्याच मोहिमांमध्ये असते असं नाही. ज्या गोष्टी मला पटतात तिथे मी हजर असते. तिथेही माझं वैयक्तिक मत मी मांडत असते. माझं सर्वच मंडळी कौतुक करतील, असं होऊ शकत नाही. ट्रोलर्सकडे मी दुर्लक्ष करते. तसेच मला जर चांगली संधी मिळाली तर नक्कीच मी पूर्णपणे सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेईल". 


संबंधित बातम्या


MNS Jagar Yatra : मुंबई गोवा महामार्गासाठी कोकणकन्या मैदानात, म्हणाली संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर...