Shiv Thakare On Kalavantancha Ganesh : गपणती बाप्पा मोरया... असं म्हणत कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणाऱ्या 'आपला माणूस' अर्थात शिव ठाकरेचं (Shiv Thakare) आणि बाप्पाचं (Ganapati Bappa) खास नातं आहे. शिव बाप्पाचा मोठा फॅन आहे. खरं तर शिवचा एनर्जी सोर्स हा बाप्पाचं आहे. गणरायाचा (Ganeshotsav 2023) आशीर्वाद घेतल्याशिवाय शिव ठाकरे कोणतीही गोष्ट करत नाही. 


एबीपी माझाशी बाप्पाबद्दल बोलताना शिव म्हणाला," कोणत्याही कार्यक्रमात चांगली गोष्ट घडो अथवा वाईट किंवा जगात कुठेही असलो तरी बाप्पा नेहमीच माझ्यासोबत असतो. त्यामुळे मला कधीच कोणत्या गोष्टीचं टेन्शन येत नाही. बाप्पावर माझा खूप विश्वास आहे. आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. पण ते दहादिवसही बाप्पाचं करण्यात कमी पडतात. त्यामुळे बाप्पा जाताना नेहमीच मला अश्रू अनावर होतात".  


शिव ठाकरे म्हणाला,"मी झाल्यापासून आमच्या घरी गणपती येत आहेत. रिअॅलिटी शो असूदे वा कोणती स्पर्धा असूदेत. सर्वात आधी मी बाप्पाचा आशीर्वाद घेतो. 'बिग बॉस 16'साठी (Bigg Boss 16) विचारणा झाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. माझ्या मालाडमधील घरापासून मी दादरच्या सिद्धीविनायकापर्यंत पायी गेलो होतो. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोणतीही गोष्ट केली की ती चांगलीच होती". 


शिव पुढे म्हणाला,"बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. बाप्पा आल्यावर दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. आरती, मोदक, दुर्वा.. या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा असते. गणपतीच्या काळात घरच्यांना मदत करायला मला आवडतं. आरती म्हणताना मजा येते. जी ओळ येते ती मी खूप जोरात बोलतो". 


शिवने बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला केली सुरुवात


शिव ठाकरेने बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"बाप्पाची यंदाची आरास खूप खास असणार आहे. सजावटीची तयारीदेखील सुरू झाली आहे. आमच्या अमरावतीच्या घरी बाप्पा येतो. आता लवकरच बाप्पा येणार असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही मी खूप उत्सुक आहे. बाप्पाची मूर्ती मी निवडतो. त्याचे डोळे मला खूप आवडतात. मला हवी असलेली बाप्पाची मूर्वी शोधण्यासाठी अमरावतीत मी दोन-दोन दिवस फिरतो".


मराठमोळा शिव ठाकरे गाजवतोय 'खतरों के खिलाडी 13'!


शिव ठाकरे सध्या 'खतरों के खिलाडी 13'मध्ये (Khatron Ke Khiladi 13) स्टंटबाजी करताना दिसत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"खतरों के खिलाडी'मध्ये स्टंट करण्यासोबत मी हा प्रवास एन्जॉय करत आहे. तुमचा मराठमोळा शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी'सारखा कार्यक्रम गाजवत आहे. तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा असाच कायम ठेवा". 


संबंधित बातम्या


Kalavantancha Ganesh : "बाप्पा कायम माझ्या पाठीशी"; 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम कार्तिकी गायकवाडला आवडतं गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करायला