Kartiki Gaikwad On Kalavantancha Ganesh : विघ्नहर्ता गणपती बाप्पावर (Ganapati Bappa) अनेकांची नितांत श्रद्धा असते. गणेशोत्सवाचं स्वत:चं वेगळं महत्तव आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आहे. गणपती बाप्पा हा प्रत्येकासाठीच खास असतो. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसाठीदेखील खास असतो. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम (Sa Re Ga Ma Pa Little Champs) कार्तिकी गायकवाडसाठीदेखील (Kartiki Gaikwad) बाप्पा खूप खास आहे. गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करताना तिला खूप आनंद मिळतो.
कार्तिकी गायकवाड आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे?
एबीपी माझाशी बोलताना कार्तिकी म्हणाली,"गणपती बाप्पा माझ्या कायम पाठीशी आहे..आशीर्वाद आहेच. बाप्पा फक्त 10 दिवस नव्हे तर अखंडीत आपल्यासोबत आहेत. पण बाप्पा घरी येतात तेव्हा दहा दिवसांचा माहोलच वेगळा असतो. बाप्पासमोर रियाज करणं. कार्यक्रम सादर करणं..गणेशोत्सवात कार्यक्रम सादर करताना एक वेगळाच आनंद असतो. एकंदरीत बाप्पा आले की सर्वत्र सकारात्मकता येते. बाप्पाची मूर्ती निवडण्यापासून, सजावट ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यात वेगळीच गंमत असते. कुटुंबातील सर्व मंडळी मिळून आम्ही हा सण साजरा करतो".
बाप्पा माझ्या कायम पाठीशी : कार्तिकी गायकवाड
बाप्पाबद्दल बोलताना कार्तिकी म्हणाली,"प्रत्येक क्षणी वाटतं की, बाप्पा माझ्या पाठीशी आहे. गाणं सादर करायचं म्हटलं तरी गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेतच. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणरायाचे मंगलमय स्मरण करून करतो. माझ्या कार्यक्रमात माझं पहिलं गाणं हे बाप्पाचं असतं. त्यामुळे बाप्पा कायम आपल्या पाठीशी आहे, असं वाटतं. बाप्पा आले की आमच्या घरचं वातावरण सकारात्मकतेने भरलेलं असतं. बाप्पाच्या मूर्तीकडे बघत बसणं किंवा आई जे प्रसादाला बनवते ते खाणं या सगळ्यात एक उत्साहाचं वातावरण असतं".
कार्तिकी गायकवाडच्या आठवणीतला गणेशोत्सव कोणता?
आठवणीतल्या गणेशोत्सवाबद्दल बोलताना कार्तिकी म्हणते,"दरवर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास असतो. गणेशोत्सवादरम्यान आमच्या 'स्वरानुभूती' या कार्यक्रमाचा 100 वा प्रयोग आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवासाठी केला होता. ही गणेशोत्सातील आठवणीत राहणारी एक गोष्ट आहे. आपलं गाणं बाप्पासमोर सादर होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे".
कार्तिकी गायकवाड दरवर्षी बाप्पाची सुंदर आरास बनवते. यंदा बाप्पाची आरास नैसर्गिक करण्याचा तिचा विचार आहे. पर्यावरणपूरक सजावट करण्यावर यंदा भर असेल तसेच यंदाची थीम ही निसर्गाशी निगडीत आहे, असं कार्तिकी म्हणाली.
संबंधित बातम्या