Prathamesh Parab On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पासोबत प्रत्येकाचं एक खास नातं असतं. तो कधी आपला मित्र असतो, कधी मोठा भाऊ असतो. अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि बाप्पाचंही खास नातं आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये प्रथमेशने बाप्पासोबतचं त्याचं नातं शेअर केलं आहे. 


एबीपी माझाशी बोलताना प्रथमेश म्हणाला,"माझं नाव प्रथमेश हे बाप्पावरून आलेलं आहे. आपण नेहमीच आपल्या मागण्या सगळ्यात आधी गणपती बाप्पाला सांगत असतो. मला आजवर जे काही मिळालं आहे ते सगळं मी बाप्पाकडे मागितलं आहे. बाप्पाच्याच आशीर्वादाने मला यश मिळालं आहे. मुंबईतील आमच्या घरी बाप्पा येत नसला तरी आमच्या गावी कोकणात 11 दिवसांचा बाप्पा असतो. गणेशोत्सवात गावी खूप मजा असते. कोकणातल्या गणेशोत्सवाची मजा काही वेगळीच आहे". 


अन् प्रथमेशला वाटलं बाप्पा माझ्या पाठीशी


प्रथमेश परब म्हणाला,"मला 26 जुलैचा एक अनुभव आठवत आहे. शाळेतून येताना एका व्यक्तीने मला वेगळ्याच ठिकाणी नेऊन सोडलं. रस्त्यात खूप पाणी साचलं होतं. मी त्याला म्हटलं की, मी याबाजुला राहत नाही. दुसरीकडे राहतो. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती मला भेटला. त्याने मला उचललं आणि भर पावसात घराजवळ सोडलं. तिथे घराजवळ एक गणपतीचं मंदीर होतं. त्यावेळी मी तिथेच त्या व्यक्तीला आणि गणपती बाप्पाचे आभार मानले. त्यावेळी मला वाटलं की बाप्पा माझ्या पाठीशी आहे". 


प्रथमेश पुढे म्हणाला,"बालकपालक', 'टाइमपास' सिनेमासाठी मला खूप पुरस्कार मिळाले होते. 'टाइमपास' सिनेमानंतर मी जेव्हा पहिल्यांदा गावी गेलो होतो. त्यावेळी गावकऱ्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार होणं हे माझ्यासाठी खूप विशेष होतं. तुमच्या कामाचा गावातील मंडळींना अभिमान वाटतो. ही अभिमानास्पद बाब आहे". 


प्रथमेशसाठी यंदाचा गणेशोत्सव स्पेशल


प्रथमेश परबसाठी यंदाचा गणेशोत्सव खूप स्पेशल आहे. प्रथमेश म्हणाला,"आमच्या 'सिंगल' या सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमाचं शूटिंगही गणेशोत्सवादरम्यान केलं होतं. आता 27 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे आहे. त्याच्यासोबत काम करणं माझ्यासाठी खूप खास आहे. बाप्पाच्या आशीर्वादासाठी जशी गर्दी होते तशी आमच्या सिनेमासाठीही व्हावी, अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो. बाप्पाकडे मागणं हेच आहे की, सगळीकडे सुख, शांती नांदू दे. वाईट गोष्टी कमी होऊदेत आणि बाप्पाच्या आशीर्वादाने चांगल्या गोष्टी आमच्या सर्वांकडून होऊदेत. प्रत्येकाला यश मिळूदे". 


प्रथमेशचा 'सिंगल' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!


प्रथमेश परबचा 'सिंगल' हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. आता या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Kedar Shinde : लालबागच्या राजाच्या चरणी गेलो, साकडं घातलं अन् वर्षभरातच इच्छापूर्ती; बाप्पा पाठीशी नाहीतर सोबत : केदार शिंदे