पाहिलंत? तुम्ही रिअल लाईफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात असं ट्वीट जेनेलिया देशमुखने केलं आहे. आता प्रश्न असा आहे की असं ट्वीट करण्यामागे नेमकं काय घडलं? त्यासाठी आपल्याला पण थोडा रिव्हर्स गिअर टाकावा लागेल.
तर या सगळ्याची सुरुवात झाली रितेश देशमुखने ट्वीट केलेल्या या फोटोपासून. या भारी फोटोवर लय भारी कमेंट यायला लागल्या. त्यात सिद्धार्थ जाधव तरी कसा मागे राहिल. सिद्धार्थने पण कमेंट केली. अगदी दोन शब्दात... "सर सुपर"
आता सरांना सुपर म्हटल्यावर मॅडम कशा शांत बसतील. त्यांनी सिद्धार्थला थेट मराठीत विचारलं. "सर सुपर आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही?"
वहिनीसाहेब आपल्याला असं कोंडीत पकडतील याची बिचाऱ्या सिद्धार्थने अपेक्षाच केली नसावी. आता यावर उत्तर तर दिलंच पाहिजे. म्हणून मग सिद्धार्थने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
'सर सुपर वुमन आहेत जेनेलिया मॅम. आऊटस्टॅडिंग फोटो काढलाय असं लिहायचं होतं. टायपिंग मिस्टेक सुपर क्लिक", असं ट्वीट करुन सिद्धार्थने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर जेनेलियाने षटकार मारला आणि त्याला 'फास्टर फेणे'मधल्या रिव्हर्स किंगची आठवण करुन दिली. तिने ट्वीटमध्ये लिहिलं की, "तुम्ही रिअल लाईफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात, जमलंय बघा."
आता यावर सिद्धार्थने आणखी काही बोलणं शक्य नव्हतं. "वहिनीसाहेब", असं म्हणत त्याने फक्त हात जोडले.
अर्थात हे सगळंच गंमतीत सुरु होतं. पण जेनेलियाने घेतलेल्या या शाळेमुळे सिद्धार्थ इथून पुढे कमेंट करताना हजारवेळा विचार करेल यात शंका नाही.