मुंबई : ग्लॅमरस बॉलिवूड चित्रपटांना बगल देत दिग्दर्शक अनुराग कश्यपने सात वर्षांपूर्वी 'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीदेखील या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं. आजही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या चित्रपटाने अनुराग कश्यपच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. परंतु तरीदेखील या चित्रपटाने मला बरबाद केलं असल्याचे अनुरागने म्हटले आहे.

'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. या चित्रपटाला आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटाच्या चाहत्यांनी आज ट्विटरवर #7YearsOfGangsOfWasseypur आणि #GangsofWasseypur हे हॅशटॅग ट्रेण्ड केले आहेत.

'गँग्स..'ला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमत्त अनुरागने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये अनुराग म्हणतो की, सात वर्षांपूर्वी माझं आयुष्य बरबाद झालं होतं. मी हा चित्रपट बनवला तेव्हापासून सर्वांना असं वाटतं की मी पुन्हा-पुन्हा असेच चित्रपट बनवावे. परंतु मी मात्र त्यापासून दूर पळू पाहतोय. परंतु माझे सर्व प्रयत्न अयशस्वी होत आहेत. मी अपेक्षा करतो की 2019 च्या शेवटपर्यंत माझ्यामागे लागलेली ही साडेसाती संपेल.


दरम्यान, 'गँग्स..'च्या तिसऱ्या भागाची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. अनुरागने ट्वीटमध्ये म्हटल्याप्रमाणे 2019 च्या शेवटपर्यंत त्याची साडेसाती संपेल, याचा अर्थ या चित्रपटाचा तिसरा भाग यावर्षीच्या अखेरपर्यंत येईल, असा तर्क 'गँग्स..'च्या चाहत्यांनी लावला आहे.

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा उत्तम : अनुराग कश्यप | एबीपी माझा



सत्य घटनेवर आधारीत 'गँग्स..' हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला होता. ओपनिंग विकेंडमध्ये या चित्रपटाने 10 कोटी रुपयांची कमाई केली होती. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील वासेपूर गावाच्या आसपास घडणारी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटात मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पियुष मिश्रा, रिचा चड्ढा, हुमा कुरेशी, तिग्मांशू धुलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

‘सारं काही समष्टीसाठी 2019’ च्या निमित्ताने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याशी बातचीत | एबीपी माझा