जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानसह इतर कलाकारांबाबत कोर्टाचा निर्णय 5 एप्रिलला येणार आहे. जोधपूरचं कोर्ट यावर सुनावणी करणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सलमानसह इतर कलाकारही जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं असल्याचं बोललं जातं. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
पहिला खटला – मथानियामध्ये काळवीट शिकार
दुसरा खटला – भवादमध्ये काळवीटाची शिकार
तिसरा खटला – कांकाणीमध्ये दोन काळवीटांची शिकार
चौथा खटला – परवाना संपलेला असतानाही रायफल बाळगली (शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला)
सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका जागी जमण्याचा गुन्हा दाखल आहे.
वकिलांचा युक्तिवाद काय?
त्या रात्री सर्व कलाकार जिप्सी कारमध्ये होते, असा दावा सराकरी वकील भवानी सिंह भाटी यांचा आहे, तर सलमान खान जिप्सी चालवत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. काळवीट पाहताच त्याने गोळी चालवली आणि यामध्ये दोन काळवीटांचा मृत्यू झाला. लोकांनी जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा या कलाकारांचा पाठलाग केला, मात्र सर्व जण मृत काळवीटांना सोडून पळून गेले, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.
फिर्यादींच्या दाव्यात अनेक प्रकारच्या उणिवा असून काळवीटाचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हे अजून फिर्यादींनी सिद्ध केलेलं नाही, असं सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांचं म्हणणं आहे. काळवीटांचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या तपासावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असा प्रतिदावा सलमानच्या वकिलांनी केला. या प्रकरणात दुष्यंत सिंह आणि दिनेश सिंह हे आणखी दोन आरोपी आहेत. काळवीटांची शिकार करताना दुष्यंत सिंह सलमानच्यासोबत होता, असं बोललं जातं, तर दिनेश सिंह हा सलमानचा सहाय्यक असल्याचं बोललं जातं.
खटला कुणी दाखल केला?
सलमान खानसह सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.