कोटा : रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला रेल्वे प्रवास बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी शाहरुख विरोधात राजस्थानमधील कोटामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रईस चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी म्हणजे 24 जानेवारीला शाहरुखने ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईहून दिल्लीला रेल्वेने प्रवास केला होता. त्यावेळी ही ट्रेन काही स्टेशन्सवर थांबली होती. त्यामध्ये कोटा या रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. कोटा स्थानकावर शाहरुखच्या चाहत्यांमुळे गोंधळ आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार स्टेशनवरील स्टॉलधारक विक्रम सिंगने केला आहे.

शाहरुखने ट्रेनच्या गेटवर उभं राहून चाहत्यांच्या दिशेने काहीतरी भिरकावलं. ती वस्तू पकडण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. या गोंधळात आपली ट्रॉली उलटली, विक्रीला ठेवलेल्या वस्तूंचं नुकसान झालं आणि आपण जखमी झाल्याचा दावाही सिंग यांनी तक्रारीत केला आहे. आपल्या ट्रॉलीतील काही रोकडही गर्दीतील माणसांनी चोरल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे. त्यानंतर कोटी जीआरपीने दंगल आणि रेल्वेच्या
मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी शाहरुखवर गुन्हा नोंदवला आहे.

चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त केलेला हा उपक्रम #RaeesByRail या हॅशटॅगसह सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये होता. 24 जानेवारीला पहाटे पाच वाजता शाहरुख कोटा स्थानकावर आला होता. निव्वळ चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता शाहरुखच्या पीआर टीमने हे आयोजन केलं होतं, असं जीआरपी अधीक्षक मेघवाल यांनी म्हटलं आहे.

एसआरकेने स्वतः खाली न उतरता गिफ्ट्स ट्रेनच्या दारातूनच भिरकावल्याने चाहत्यांची झुंबड उडाली आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्याऐवजी त्याने खिडकीतूनच चाहत्यांना अभिवादन केलं असतं, तर ट्रेन लेट झाली नसती आणि रेल्वे किंवा विक्रेत्याच्या मालमत्तेचं नुकसान झालं नसतं, असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

'रईस' शाहरुखसाठी गर्दी, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू


रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी  शाहरुख खानला पाहण्यासाठी बडोद्यातही चाहत्यांची झुंबड उडाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आपल्या बहिणीला सोडण्यास आलेल्या एका स्थानिक नेत्याला आपला जीव गमावावा लागला. फरीद खान यांचा मृत्यू झाला, तर यावेळी दोन पोलिसही जखमी झाले.

बडोदा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली होती. चाहत्यांनी रेल्वे ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी केली होती. रेल्वेच्या टपावर चढूनही चाहत्यांनी रेल्वे रोखून धरली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होऊन चेंगराचेंगरी झाली.