Arun Verma Passed away : अनेक हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले अभिनेते अरुण वर्मा (Arun Verma) यांचे बुधवारी मध्यरात्री 2 वाजता भोपाळ येथील पीपल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते.


अरुण शर्मा यांनी जेपी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखालील 'डकैत' (1987) या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी 'हिना' (1991), ‘खलनायक’ (1993), ‘प्रेम ग्रंथ’ (1996), ‘नायक’ (2001), ‘मुझसे शादी करोगी’ (2004), ‘हिरोपंती’ (2014) अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. 6 महिन्यांपूर्वी अरुण वर्मा यांनी कंगना रणौत निर्मित 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटासाठी भोपाळमध्ये नवाजुद्दीनसोबत शूटिंग केले होते.


अरुण शर्मा यांचे पुतणे अमित वर्मा यांनी भोपाळहून फोनवरून एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘काका गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना श्वासोच्छवास करण्यास खूप त्रास होत होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.  परंतु, नंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांनी काम करणे पूर्णपणे बंद केले. शेवटी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.’


अरुण वर्मा यांच्या जवळच्या मित्रपरिवारातील अभिनेत्री टीना घई यांनी एबीपीशी बोलताना सांगितले की, अरुण वर्मा आर्थिक संकटात होते आणि अशा परिस्थितीत सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) त्यांच्या उपचारासाठी 50,000 रुपये दिले होते. टीना सांगतात की, त्यांनी वैयक्तिकरित्या 25,000 रुपये जमा केले आणि ते त्यांच्या उपचारासाठी पाठवले.


अभिनेते अरुण वर्मा यांच्या पार्थिवावर आज (20 जानेवारी) दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान भदभदा विश्राम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha