मुंबई : यंगिस्तान, यमला पगला दिवाना आणि तान्हाजी यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) बऱ्यापैकी यश मिळालं, पण अनेकांना पराभवचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीत अनेक मोठे पक्ष एकत्र होते. मात्र, जनता दल युनायटेड (JDU) पक्षाच्या उमेदवाराकडून अजित शर्मा यांना बिहारमधून पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे, वडिलांच्या पराभवानंतर भावूक झालेल्या अभिनेत्री असलेल्या लेकीनं वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 


अभिनेत्री नेहा शर्माचे वडील अजित शर्मा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बिहारमधून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अजित शर्मा जेडीयूचे उमेदवार अजय मंडल यांच्याकडून पराभूत झाले. एनडीए आघाडीत जदयू आणि भाजपची आघाडी होती. त्यामुळे, अजित शर्मा यांना पराभव पत्कारावा लागला,  ते काँग्रेसचे उमेदवार होते. ते बिहारच्या भागलपूर मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. या जागेवर जेडीयूचे उमेदवार अजय मंडल यांनी अजित शर्मा यांचा पराभव केला. अजित शर्मा यांना 2 लाख 13 हजार 383 मतं मिळाली. तर जेडीयूचे अजय मंडल यांना 2 लाख 79 हजार 323 मतं मिळाली आहेत. वडिलांच्या पराभवानंतर अभिनेत्री नेहा शर्माने सोशल मीडियातून भावना व्यक्त केल्या आहेत.


नेहाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट केली आहे. आमच्यासाठी हा कठीण दिवस होता पण आम्ही खूप चांगले लढलो. ज्यांनी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना मतदान केले त्या सर्वांची मी खूप आभारी आहे, असं तिने लिहिलं आहे. इतकंच नाही तर तिने हिंदीतील काही ओळीही तिच्या पोस्टमध्ये शेअर केल्या.


सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो, तुम निडर डरो नहीं, तुम निडर डटो वहीं, वीर तुम बढ़े चलो ! धीर तुम बढ़े चलो ! 


नेहाने असं तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप एनडीएला बहुमताचा आकडा गाठता आला असून इंडिया आघाडीनेही 233 पर्यंत आघाडी घेतली. त्यामुळे, बहुमताच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए आघाडी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. 


हेही वाचा


Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप