The Legend Of Hanuman Season 4 Review: रामायणाची कथा प्रत्येकाला ऐकायची असते, त्यातील सांगितलेले मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. रुपेरी पडदा असो किंवा छोटा पडदा अथवा ओटीटी, ॲनिमेशन असो, प्रत्येकाला रामायण सादर करणाऱ्या कलाकृतींकडून मोठी अपेक्षा असते. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित झालेली 'द लिजेंड ऑफ हनुमान सीझन 4' (The Legend Of Hanuman Season 4) ही वेब सीरिज चांगलीच जमली असून पाहण्यासारखी झाली आहे.
वेब सीरिजची गोष्ट काय?
वेब सीरिजच्या नावावरूनच ही गोष्ट हनुमानाशी संबंधित आहे आणि जिथे हनुमान आहेत तिथे प्रभू श्रीराम असणारच. मात्र, सीरिजमधील रामायण हे हनुमानाच्या दृष्टीकोनातून आहे. वेब सीरिजचा हा चौथा सीझन असून आता यामध्ये कुंभकर्णाची एन्ट्री झाली आहे. आता, कुंभकर्णाचा वध कसा होणार आणि रामायणाची कथा रावण वधाकडे कशी वळणार, या कथानकाभोवती या सीझनची कथा आहे.
कशी आहे वेब सीरिज?
या वेब सीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम आवाज आणि अप्रतिम ॲनिमेशन. वेब सीरिजमधील ॲनिमेशन हे फक्त लहान मुलानांच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांना खिळवून ठेवणारे आहे. नव्या पिढीतील लोकांपर्यंत रामायण पोहचवण्यासाठी ही अॅनिमेटेड सीरिज फायदेशीर आहे. संवादही सोप्या भाषेत आहेत. प्रत्येक एपिसोड हा 20 मिनिटांचा आहे.
कलाकारांचा अभिनय
अॅनिमेटेड सीरिजमध्ये आवाजाची महत्त्वाची भूमिका असते. या अॅनिमेटेड सीरिजमध्ये आपला आवाज देणे ही एक मजेशीर बाब आहे. यातील प्रत्येक कलाकाराने कमालीची व्हाईस अॅक्टिंग केली आहे. शरद केळकर यांनी रावणाला आवाज दिला आहे. त्याचा आवाज या वेब सीरिजचा प्राण आहे. दमनदीप सिंह बग्नन यांनी हनुमानाजींचा पात्राला आवाज दिला आहे. त्यांनी उत्तम काम केले. इतर पात्रांनीदेखील चांगले काम केले आहे.
या मालिकेचे ॲनिमेशन शरद देवराजन यांच्या कंपनीने तयार केले असून या सीरिजचे ते क्रिएटर आहेत. ॲनिमेशनही उत्तम आहे.
चौथ्या सीझनचे दोनच एपिसोड रिलीज करण्यात आले आहेत. दर आठवड्याला एक एपिसोड रिलीज करण्यात येणार आहे. आता दर आठवड्याला एक एपिसोड पाहण्यासाठीचा संयम प्रेक्षक दाखवतील का हाच प्रश्न आहे.