Saumya Tandon News: प्रसिद्ध मालिका 'भाभीजी घर पर है'मध्ये अनिता भाभीचे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने 2008 मध्ये अफगाणिस्तानच्या शो 'खुशी' मध्ये खुशीची मुख्य भूमिका साकारली होती. हा शो एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा भाग होता. सौम्याने एक महिना काबुलमध्ये शोचे शूटिंग केले होते. यावेळी आलेले अनुभव एबीपी न्यूजसोबत शेअर केलेत.


सौम्याने सांगितले की अफगाणी आणि अमेरिकन सैन्याच्या छायेखाली तिने आणि शोच्या संपूर्ण क्रूने काबुलमध्ये शो कसा शूट केला. तिने सांगितले की काबूलमध्ये उतरल्यानंतर चार दिवसांनी भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्यात आलं होतं.


काबुलच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्येही या शोचे चित्रीकरण झाले. सौम्याने शोमध्ये खुशी नावाच्या डॉक्टरची भूमिका साकारली होती. सौम्यासोबत एक भारतीय महिला सह-कलाकार आणि क्रूमधील दुसरी महिला देखील काम करत होती. सौम्याने सांगितले की त्या काळातही महिलांचे स्वातंत्र्य आणि वेषभूषा याबाबत कडक नियम होते.




सौम्याने सांगितले की त्यावेळी तिला सलवार-कमीज आणि पायात मोजे घालावे लागायचे जेणेकरून तिचे नखेही दिसू नयेत. शूटिंगनंतर महिला बाहेर येणे टाळत असत.


सौम्याने सांगितले की, अफगाणिस्तानचे लोक खूप दयाळू आहेत. त्यांनी पाहुणचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जेव्हाही तिला कुठेही जाण्याची किंवा बाजारात जाण्याची संधी मिळायची त्यावेळी केवळ भारतीय असल्याने दुकानदारांनी तिच्याकडून पैसे घेतले नाहीत.


सौम्या म्हणाला की, अफगाण लोकांमध्ये भारतीयांबद्दल खूप आदर आहे, ते अनेकदा अफगाणिस्तानमध्ये (त्यावेळी) चित्रीत झालेला 'खुदा गवाह' या चित्रपटाची चर्चा करायचे, या चित्रपटातील गाणी गायचे. तिथं अमिताभ बच्चन यांच्यावरही चर्चा केली जात होती.




एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना सौम्याने काबूलमध्ये शूटिंगच्या आणखी अनेक सुखद आठवणी शेअर केल्या. सौम्या म्हणाली की, गेल्या काही दिवसांमध्ये काबूल आणि अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती झपाट्याने बदलली आहे, ते अतिशय दुःखद आहे आणि तिच्यासाठी सर्व काही अविश्वसनीय आहे.


सौम्याने सांगितले की ती अफगाण लोकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षा आणि मानवी हक्कांबद्दल खूप चिंतित आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ती म्हणाली की, गेल्या 20 वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये महिलांबाबत जी काही प्रगती दिसून येत आहे, ती एका क्षणात तालिबानच्या कब्जाने निराशाजनक स्थितीत पोहोचली आहे.


सौम्या म्हणाली की, काबूलमध्ये परिस्थिती बदलल्यानंतर तिने शोच्या शूटिंग दरम्यान ओळख झालेल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही.