Esmayeel Shroff: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ (Esmayeel Shroff) यांचे काल (26 ऑक्टोबर) मुंबईत निधन झाले. इस्माईल श्रॉफ यांनी आहिस्ता आहिस्ता, थोडी सी बेवफाई, बुलंदी, सुर्या, गॉड अँड गन, पोलीस पब्लिक, निश्चय, तरकीब, मझदर यांसारखे अनेक हिट आणि लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केले होते. इस्माईल श्रॉफ यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुपरस्टार्सच्या चित्रपटांचे केले दिग्दर्शन
इस्माईल श्रॉफ यांनी प्रसिद्ध अभिनेते राजकुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर ते सलमान खान अशा अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केलं काम
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी इस्माईल श्रॉफ यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ध्वनी अभियांत्रिकीचा कोर्स केला. त्यानंतर चित्रपटात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. साधू और शैतान या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 2004 साली प्रदर्शित झालेला 'थोडा तुम बदलो थोडा हम' हा त्यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट होता. इस्माईल श्रॉफ यांनी जळपास 15 चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. 'थोड़ी सी बेवफाई' या चित्रपटांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
एबीपी न्यूजला माहिती देताना मुलगा फहाद खानने सांगितले की, 29 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील इस्माईल श्रॉफ यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे निकामी झाला होता आणि त्यांना चालता येत नव्हते.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले होते. परंतु आज सकाळी 6.40 वाजता इस्माईल श्रॉफ हे त्यांच्या अंधेरी येथील घरी जमिनीवर कोसळले, त्यानंतर त्यांना पुन्हा अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.
एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितलं की, 'त्याच्या 'थोडीसी बेवफाई' आणि 'आहिस्ता आहिस्ता' या चित्रपटांमध्ये मी काम केले. आहिस्ता आहिस्ता हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. त्यांचा स्वभाव कडक होता पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. ते अतिशय संवेदनशील दिग्दर्शक होते.त्यांनी इंडस्ट्रीत आपली छाप सोडली आहे.'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: