Ekta Kapoor : टीव्ही निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची बातमी नुकतीच चर्चेत आली होती. एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसच्या ‘XXX’ या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या एका आक्षेपार्ह दृश्यावरून वाद झाला होता. वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान करण्यात आला असून, भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले गेले होते. एका व्यक्तीने बिहारच्या बेगुसराय न्यायालयात या मालिकेच्या एका सीनबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी तिला अटक वॉरंट देण्यात आल्याचे म्हटले गेले होते. मात्र, आता एकता कपूरच्या वकिलाने या संपूर्ण प्रकरणात अटक वॉरंट मिळाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.


या वृत्तांवर आता एकता कपूरच्या वकिलाने निवेदन जारी केले आहे. एकताच्या वकिलाने म्हटले की, काही दिवसांपूर्वी बेगुसराय येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्याचे आरोप करण्यात आला आहे. मात्र, तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या वकिलाच्या कथित विधानांच्या आधारे तयार करण्यात आलेले हे अहवाल खोटे असून, एकता कपूर किंवा शोभा कपूर यांना कोणतेही अटक वॉरंट मिळालेले नाही, असे एकता कपूरच्या वकिलांनी म्हटले आहे.


नेमकं प्रकरण काय?


एकता कपूरच्या ‘अल्ट बालाजी’ या बॅनरखाली बनलेली 'ट्रिपल एक्स सीझन 2' ही वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर एकतावर देशाच्या सैनिकांच्या चारित्र्याचा, त्यांच्या गणवेशाचा आणि त्यांच्या पत्नींचा अपमान केल्याचा आरोप केला गेला होता. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले होते की, जेव्हा एखादा सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतो, तेव्हा त्याची पत्नी त्याच्या पाठीमागे इतर पुरुषांशी अवैध संबंध ठेवते. एवढेच नाही, तर या स्त्रीया इतर पुरुषांना घरी बोलावून, पतीचा सैनिकी गणवेश घालून परपुरुषासोबत घृणास्पद काम करतात.


एकता कपूरच्या (Ekta Kapoor) याच ‘ट्रिपल एक्स’ या वेब सीरिज विरोधात माजी सैनिक शंभू कुमार यांनी 6 जून 2020 रोजी न्यायालयात तक्रार पत्र दाखल केले. एकता कपूरच्या 'ट्रिपल एक्स सीझन 2' या वेब सीरिजमध्ये भारतीय जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. शंभू कुमार म्हणाले की, भारतीय सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करतात. त्यांना आदराने वागवले पाहिजे. पण, या वेब सीरिजमध्ये भारतीय सैनिक आणि त्याच्या पत्नीचे असे चुकीच्या पद्धतीने चित्रण करणे हा सैनिकांचा अपमान असल्याचे, त्यांनी म्हटले होते.


हेही वाचा :


Triple X-2 | वादग्रस्त वेब सीरिज 'ट्रिपल X-2'संदर्भात एकता कपूरने सोडलं मौन!


वेब सीरिज सेन्सॉरशिपखाली आणावी; माजी ब्रिगेडियर आणि लोकसभेचे माजी खासदार सुधीर सावंत यांची मागणी