ED attaches  Shilpa Shetty Raj Kundras Property :  ईडीने आज व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी,  राज कुंद्रा याची 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत राज कुंद्रा (Raj Kundra) यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. वर्ष 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा याची काही महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली.


मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रा विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला  जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावाने असलेले काही इक्विटी शेअर्सही जप्त केले आहेत. 






ईडीकडून राज कुंद्राविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे. एका क्रिप्टोकरन्सी प्रकरणात ईडीकडून राज कुंद्राची चौकशी सुरू आहे. भारतात क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे. पण राज कुंद्राने बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करून व्यवहारात फेरफार केल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. 


बिटकॉईन  प्रकरणात 2018 मध्ये झाली होती चौकशी


यापूर्वी 2018 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने 2000 कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी राज कुंद्रा यांची चौकशी केली होती. ईडीच्या एका अधिकाऱ्याने तेव्हा सांगितले होते की, ठाणे गुन्हे शाखेत दाखल झालेल्या गुन्ह्यात राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राची या घोटाळ्यात काही भूमिका आहे की ते पीडित आहेत हे स्पष्ट नाही, असे त्या अधिकाऱ्याने तेव्हा सांगितले होते. मात्र आता ज्या प्रकारे मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढू शकतात.