Siddharth Bodke On Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांचं त्यांच्या दमदार अभिनयासाठी कौतुक होत आहे. पण दुसरीकडे या सिनेमातील एका मराठमोळ्या चेहऱ्याने सिने-प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  


'दृश्यम 2'चं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाच्या माध्यमातून अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान या सिनेमातील मराठमोळ्या अभिनेत्याचं चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) अजय देवगणसोबत  झळकत आहे. 






'तू अशी जवळी राहा' या मालिकेत सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत होता. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने अभिनेत्री तितिक्षा तावडेसोबत काम केलं. त्याने 'अनन्या' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता 'दृश्यम 2'च्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 


सिद्धार्थ बोडके झळकलाय मराठी सिनेमांत!


सिद्धार्थ बोडकेने मालिका आणि नाटकांसह सिनेमांतदेखील काम केलं आहे. 'भय', 'नेबर्स' या मराठी सिनेमांत सिद्धार्थच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. 'व्हायरल जोडी' या वेबसीरिजमध्येदेखील सिद्धार्थने काम केलं आहे. आता 'दृश्यम 2'मध्ये सिद्धार्थ डेव्हिडच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिद्धार्थचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. 


तितिक्षा तावडेने सिद्धार्थला शुभेच्छा देत लिहिलं आहे,'दृश्यम 2' या सिनेमासाठी कष्ट घेताना मी तुला पाहिलं आहे. तू केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला यश आलं आहे. मला तुझा नेहमीच अभिमान वाटतो. तुझं अगदी मनापासून कौतुक". तितिक्षाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Drishyam 2: बॉक्स ऑफिसवर अजय देवगणची जादू; 'दृश्यम 2' नं दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई