Divyanka Tripathi: छोट्या पडद्यावरील कलाकारांना मालिकांमुळे मोठी प्रसिद्धी मिळते. मालिका विश्वात लोकप्रिय झालेल्या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग असतो. महिला वर्गात मालिकांची लोकप्रियता मोठी असते. काही अभिनेते-अभिनेत्री चुकून या अभिनयाच्या क्षेत्रात आलेत. मात्र, त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
सध्या टीव्ही मालिका जगतात राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला कधीच अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ही अभिनेत्री म्हणजे 'ये है मोहब्बतें' या मालिकेतील इशिता भल्ला म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आहे. दिव्यांका आज टीव्हीमधलं मोठं नाव आहे.
दिव्यांका केवळ लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीच नाही तर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील आहे. दिव्यांका ही तिच्या प्रत्येक शोसाठी प्रचंड मानधन आकारते. पण लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न घेतलेली दिव्यांका ही अभिनयाच्या जगात अपघाताने दाखल झाली.
दिव्यांकाने स्वत: याबाबत एकदा उत्तर दिले. दिव्यांकाने सांगितले की, तिला लहानपणापासूनच आर्मी ऑफिसर बनायचे होते. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा तिने विचारही केला नव्हता. पण नशिबाने ती या क्षेत्रात आली.
सौंदर्य स्पर्धेने मिळाली कलाटणी
दिव्यांकाच्या कारकिर्दीला एका सौंदर्यवती स्पर्धेने कलाटणी दिली. छोट्या पडद्यावरील आदर्श सून असणाऱ्या दिव्यांकाने सांगितले की, तिने तिच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून भोपाळमधील सौंदर्य स्पर्धेत सहजपणे गंमतीने सहभाग घेतला होता. दिव्यांका केवळ सुंदरच नाही तर टॅलेंटटेडही होती. गंमत म्हणून सौंदर्य स्पर्धेत गेलेली दिव्यांका या स्पर्धेची विजेती ठरली. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश घेतला.
दिव्यांकाने 'बन्नू में तेरी दुल्हन' या मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या कामाला दाद मिळाली. त्यानंतर दिव्यांकाला तिची खरी ओळख 'ये है मोहब्बतें'मधून मिळाली. ही मालिका बराच काळ चालली होती. त्यात दिव्यांकाची इशिता ही मुख्य भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. या कार्यक्रमाशिवाय, 'खाना खजाना', 'मिस्टर अँड मिसेस शर्मा अलाहाबादवाले', 'रामायण', 'तेरी मेरी लव्ह स्टोरीज' आणि रियालिटी शो खतरों के खिलाडीमध्येही दिव्यांकाने सहभाग घेतला होता.
दिव्यांका त्रिपाठीही अभिनयासोबतच इतरही काही गोष्टीत निपुण आहे. ती निष्णात नेमबाज आहे. त्याशिवाय तिला बाईक रायडिंगचीदेखील हौस आहे. 'खतरो के खिलाडी' मध्ये तिला 'मगरराणी' म्हणून उपाधी देण्यात आली होती.