Dhirajlal Shah Dies :  1990 आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट देणारे निर्माते धीरजलाल शाह (Dhirajlal Shah) यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धीरजलाल शाह यांना बॉलिवूडमध्ये 'व्हिडीओ किंग' या नावानेदेखील ओळखले जात असे. धीरजलाल शाह यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 


धीरजलाल शाह यांनी अजय देवगण याच्या विजयपथ, अक्षय कुमारच्या खिलाडी या फ्रेंचाइजीतील सिनेमे आणि सनी देओल, प्रियांका चोप्रा आणि प्रीती झिंटाची भूमिका असलेल्या 'द हीरो: लव स्टोरी ऑफ ए स्पाय' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.


इंडियन फिल्म टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धीरजलाल शाह यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. 






कोविडनंतर प्रकृती अस्वस्थ


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, धीरजलाल यांचे भाऊ हसमुख यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, ' धीरजलाल शाह यांना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम झाला. त्यामुळे त्यांना प्रकृती अस्वास्थाला सामोरे जावे लागत होते.  गेल्या 20 दिवसांत त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. संसर्गाने किडनी आणि इतर अवयव निकामी होऊ लागले असल्याची माहिती  हसमुख शाह यांनी दिली. 


धीरजलाल शाह 'असे' झाले व्हिडीओ किंग


धीरजलाल शाह यांच्याबद्दल बोलताना दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी म्हटले की, ते फक्त एक चांगले निर्मातेच नव्हे तर  एक चांगली व्यक्ती होती. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपले साम्राज्य निर्माण केले होते.निर्माते हरीश सुघंद यांनी सांगितले की, धीरजलाल यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'शहेनशाह' या चित्रपटाचे व्हिडीओ राइट्स खरेदी केले होते. याचा त्यांना फायदा मिळाला. अनेक चित्रपटांचे हक्क त्यांनी खरेदी केले. त्यानंतर त्यांना 'व्हिडीओ किंग' अशी ओळख मिळाली. 


अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती 


धीरज लाल यांनी अनिल शर्मा दिग्दर्शित 'द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा आणि प्रियांका चोप्रा यांनी काम केले होते. त्याशिवाय, सुनील शेट्टी यांचा 'कृष्णा', गोविंदाची भूमिका असलेला 'गॅम्बलर' आणि अजय देवगणची भूमिका असलेला 'विजयपथ' या चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली.