सेलिब्रेटींचं आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नसतं. हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागला होता, हे बहुतेकांना माहित आहेच. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे धर्मेंद्र यांनी ही पळवाट काढली. मात्र आता ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या पूर्वायुष्याबद्दल एक वेगळीच माहिती समोर येत आहे.
राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या 'हेमा मालिनी : बियाँड द ड्रीम गर्ल' या पुस्तकाचा काही अंश हिंदुस्तान टाइम्सनी प्रकाशित केला आहे. त्यानुसार हेमा मालिनी जितेंद्रसोबत विवाहबंधनात अडकणार होत्या, मात्र धर्मेंद्र यांनी अक्षरशः त्यांचं लग्न मोडलं.
'हेमा आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. हेमाने पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांपासून आपलं रिलेशनशीप लपवलं होतं. जया म्हणजेच हेमाच्या आईला याची कुणकुण लागली. त्यामुळे तिने वेळीच हेमाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं' असं पुस्तकात म्हटलं आहे.
हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे एकत्र दोन सिनेमे दुल्हन (1974) आणि खुशबू (1975) सुरु होते. साहजिकच दोघांना एकत्र प्रसिद्धी मिळाली. जितेंद्रच्या मनातही हेमा मालिनीबद्दल हळवा कोपरा निर्माण झाला होता, मात्र हेमाने फारसा रस न दाखवल्यामुळे दोघांनी चांगले मित्र राहायचं ठरवलं, असं पुस्तकात म्हटलं आहे.
जया यांनी हेमाला जितेंद्रच्या पालकांची भेट घेण्याची गळ घातली. आईच्या तगाद्याला कंटाळून हेमामालिनीने अखेर त्यांची भेट घेतली. इथे, हेमाला भेटून जितेंद्रचे आई-वडील भलतेच खुश झाले. त्यांना आपल्या मुलाचं हेमाशी लग्न व्हावं असं वाटू लागलं. थोडक्यात, हेमा आणि जितेंद्र या दोघांच्याही आई-वडिलांना मुलांचं लग्न लावण्याची इच्छा होती.
'मला हेमाशी लग्न करायचं नाही. मी तिच्या प्रेमात पडलेलो नाही. ती माझ्या प्रेमात नाही. आमचं लग्न व्हावं, ही फक्त माझ्या कुटुंबाची इच्छा आहे. त्यामुळे मी लग्न करेनही. ती खूप चांगली मुलगी आहे' असं त्यावेळी जितेंद्रने म्हटल्याचं मित्राने सांगितलं
सनीच्या गाली 'डिम्पल', जुन्या नात्यांना लंडनमध्ये उजाळा
अखेर, हेमा, जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मद्रास (चेन्नई)ला गेले. लग्नसोहळा तिथेच पार पडणार होता. मात्र आधीच एका सायंदैनिकाला या लग्नाविषयी समजलं आणि त्यांनी 'बिग स्टोरी' केली. चित्रपटसृष्टीतील कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता, पण महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्रला याचा मोठा धक्का बसला.
धर्मेंद्र तातडीने शोभा सिप्पीच्या घरी गेला. शोभा म्हणजे जितेंद्रची गर्लफ्रेंड. एअरहॉस्टेस असलेल्या शोभासोबत धर्मेंद्रने तातडीने मद्रास गाठलं.
हेमामालिनीच्या घरी पोहचताच दिसणारं दृश्य धर्मेंद्रला चकित करणारं होतं. धर्मेंद्रला पाहून हेमाच्या वडिलांचा पारा चढला आणि त्यांनी अक्षरशः त्याला धक्के मारुन बाहेर काढलं. 'तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून का निघून जात नाहीस? तुझं लग्न झालेलं आहे. तू माझ्या लेकीशी लग्न करु शकत नाहीस' असं ते बडबडत होते.
धर्मेंद्रने गयावया केली. मात्र भावुक झालेल्या धरमने अजिबात नमतं घेतलं नाही. शेवटी, हेमाशी एकांतात बोलण्यास त्यांनी धर्मेंद्रला परवानगी दिली. हेमामालिनीचे आई-वडील, जितेंद्रचे आई-वडील आणि रजिस्ट्रार बाहेर थांबले. रुममध्ये दोघंही आठवणींनी गहिवरले होते.
रुमबाहेर येताच हेमाने हात जोडून दोन्ही कुटुंबीयांना विनंती केली. थरथरत्या आवाजात तिने निर्णयासाठी काही दिवसांची मुदत मागितली. जितेंद्रच्या आई-वडिलांना मात्र साहजिकच हा प्रकार रुचला नाही. लग्न झालं तर आत्ता, नाहीतर कधीच नाही! असा अल्टिमेटम त्यांनी दिला.
हेमाच्या उत्तरासाठी सगळ्यांच्या माना वळल्या होत्या. हेमामालिनीने त्याच क्षणी मान हलवून नकार दर्शवला. जितेंद्रसाठी हा अपमान पुरेसा होता. त्याने आई-वडिलांसोबत तडक मुंबई गाठली. त्यानंतर दोघांमध्ये कोणतेही संबंध उरले नव्हते.