Dharmaveer : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने विक्रम रचला आहे. 400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे लागले आहेत.
शिवसेनेकडून अनेक ठिकाणी स्पेशल स्क्रीनिंग
नवी मुंबईत शिवसेना नेत्यांकडू सकाळी 9.30 च्या शो चे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात आणि अहमदनगरमध्ये ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात येणार आहेत. सुभाष माने यांनी भिंवडीत खास सिनेमाच्या शो चे आयोजन केले होते. उल्हासनगरमध्ये युवासेनेतर्फे तर बदलापूरमध्येदेखील शिवसेनेतर्फे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रेक्षकांना दाखवला जाणार आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचा ठाण्यात पार पडला खास शो
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिव्हियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. दरम्यान उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आनंद दिघेंच्या कटआउट समोर विधिवत पूजा करून दुग्धाभिषेक करण्यात आला. दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले," हा सिनेमा आजच्या तरुणाईला धर्मवीर आनंद दिघे साहेबांची खरी ओळख करून देणार असून जास्तीत जास्त लोकांनी तो पहावा."
आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले सिनेमाचे भव्य दिव्य पोस्टर
मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतू आता 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाचं भव्य दिव्य पोस्टर झळकलं आहे.
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला
‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या