Dharmaveer : मराठी मनोरंजन विश्वात सध्या सगळीकडे ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची क्रेझ रिलीजपूर्वीच दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद दिघे यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व याविषयीच्या आठवणी अनेक लोक शेअर करत आहेत. आता अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने देखील तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


‘मी आजपर्यंत प्रत्यक्षात कधीच जंगलातला वाघ पाहिला नाहीए, पण मी मुंबई आणि ठाणे या माणसांच्या जंगलातले  2 खरे वाघ पाहिलेत...एक मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मा. श्री आनंद दिघे साहेब!’, असे म्हणत तिने ‘धर्मवीर’चे होर्डिंग शेअर केले आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता प्रसाद ओक याचे देखील कौतुक केले आहे.


काय म्हणाली हेमांगी कवी?


‘धर्मवीर’ या चित्रपटाचं कौतुक करताना हेमांगी म्हणते, दादरहून येताना माहीमच्या सिग्नलवरून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसाठी राईट मारला आणि डावीकडे हे डोळे दिपवणारं एका मराठी चित्रपटाचं भलं मोठ्ठं पोस्टर पाहिलं आणि खरं सांगू अंगात एक चेतना निर्माण झाली. पहिल्यांदा जेव्हा सोशल मीडियावर या फिल्मबद्दल कळलं, तेव्हा वाटलं आता काय, आणखी एक बयोपिक? तेव्हा हा सिनेमा कुणावर आहे काहीच माहीत नव्हतं. मग काही दिवसांनी एक टीझर आउट झाला आणि साला काळजात धस्स झालं (चांगल्या अर्थाने).


स्लो मोशनमध्ये चालत आलेला एक चेहरा पाहिला! आणि मनात आलं..... कसं? हे कसं शक्य आहे. ते परत आले की काय!!! मला अक्षरशः काही मिनिटं लागली भानावर यायला! इतकं साम्य? हॅट्स ऑफ त्या मेकअप आर्टिस्ट आणि लूक डिझायनरला. बरं जो कलाकार या महान व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, त्याबद्दल तर जितकं बोलू तितकं कमी पडेल! तुम्ही मेकअप आणि कपडे आणि केस करून सेम टू सेम दिसायचा प्रयत्न कराल.... यशस्वी व्हाल... अरे पण त्या 'भेदक' नजरेचं काय कराल? ते कुठून आणलंस, कसं जमवलंस मित्रा @oakprasad ? बाप रे! तू बाप आहेस! आणि ज्यांच्यावर हा बयोपिक आहे, ते आमच्या ठाणे जिल्ह्याचे वाघ 'आनंद दिघे साहेब'. फार कमी लोकं आहेत ज्यांना आतून, मनातून 'साहेब' म्हणावसं वाटतं!


'अबब' गर्दी कश्याला म्हणतात हे मला तेव्हा कळलं!


कळव्याच्या मार्केट एरिया मध्ये 2 बिल्डींगच्या निमुळत्या बोळात टेंभी नाक्यावरच्या जगप्रसिद्ध भवानी मातेची मूर्ती घडवली जायची, अजून ही घडतेय! मूर्तिकार पुंडलिक शिळकर यांच्या हस्ते! त्या 2 बिल्डींगपैकी एकामध्ये मी राहायचे. गणपती विसर्जन झाल्यावर तिसऱ्या दिवशी ज्या पाटावर देवीची मूर्ती घडवणार, त्याची पूजा केली जायची. घटस्थापनेच्या दिवशी कळवा ते टेंभी नाका या देवीची ज्या भव्यपद्धतीने मिरवणूक निघायची ना ती जगात कुठे कुणी पाहिली नसेल! इतकी भव्य आणि राजेशाही. 'अबब' गर्दी कश्याला म्हणतात हे मला तेव्हा कळलं आणि त्या गर्दीतून दुपारी 12-1च्या सुमारास आवाज यायला सुरुवात व्हायची... 'दिघे साहेब आले दिघे साहेब आले'. मला जसं समजतंय तेव्हापासून मी ही मिरवणूक पाहत आलीये, हे नाव ऐकत आलेय आणि हा भेदक नजरेचा प्रसन्न चेहेरा पाहत आलेय. दिघे साहेबांची अंगकाठी फारच लहान होती, पण त्याचं वलय 100 आडदांड माणसांचं ही कमी पडेल इतकं भारी आणि जादू करणारं होतं! आपल्या डोळ्यात न सामावणारं आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही.


त्यादिवशी माझा वाढदिवस होता!


जगाच्या पाठीवर कुठलीच स्त्री तितकी सुरक्षित नसेल, जितकी ती दिघे साहेबांच्या ठाण्यात होती आणि आता त्यांचेच शिष्य एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात आहे. आदर युक्त भीती आणि आदर युक्त वचक या दोन गोष्टींची मी स्वतः साक्षीदार आहे. रात्री बेरात्री कुठल्या ही धर्माची, जातीची, वयाची स्त्री न भीता निर्धास्तपणे राहू शकते, प्रवास करू शकते, जगू शकते ते फक्त आणि फक्त 'दिघे साहेबां'च्या त्यांच्या स्टाईलच्या कडक कायदा, सुव्यवस्थे आणि त्यांच्या दराऱ्यामुळेच! माझ्या वाढत्या वयात माझी सुरक्षितता महत्त्वाची होती आणि त्याचं रक्षण करणारी व्यक्ती तितकीच महत्त्वाची आणि जवळची आहे मला. दिघे साहेब गेले असं ज्या दिवशी सांगण्यात आलं तो रविवार होता आणि त्यादिवशी माझा वाढदिवस होता! 26 ऑगस्ट! मी कॉलेजच्या चौथ्या वर्षाला होते. आख्खं ठाणं जळत होतं. कुणालाच मान्य नव्हतं त्यांचं जाणं! कळव्यात किती तरी दिवस जीव घेणारी शांतता पसरली होती.


दगडाच्या मूर्तीच्या डोळ्यात ही पाजर फुटलेला मी पाहिलाय!


2001चा घटस्थापनेचा दिवस मला अजून आठवतोय...त्यावर्षीची ती मिरवणूक इतकी भकास आणि मनाला चटका लावून जाणारी होती काय सांगू... त्यानंतरच्या कित्येक वर्षांच्या मिरवणुका फिक्याच गेल्या. 'जय भवानी जय शिवाजी' अश्या मोठ्या आवाजात घोषणा देणाऱ्या दिघे साहेबांचे दरवर्षी न चुकता होणारे दर्शन आता यापुढे कधीच होणार नाही या फॅक्टमुळे आम्ही सगळे ढसा ढसा रडत होतो! तुम्हांला खोटं वाटेल, पण त्यावर्षी दगडाच्या मूर्तीच्या डोळ्यात ही पाजर फुटलेला मी पाहिलाय! मी देव भोळी नाही. अश्या गोष्टींना माझा मुळीच पाठिंबा नाही...पण जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेच प्रामाणिकपणे सांगतेय. मी आजपर्यंत प्रत्यक्षात कधीच जंगलातला वाघ पाहिला नाहीए पण मी मुंबई आणि ठाणे या माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत...एक मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मा. श्री आनंद दिघे साहेब! @pravinvitthaltarde @mangeshcoolkarni आणि @mangeshdesaiofficial तुम्हां तिघांचे खूप खूप आभार आणि... खूप खूप शुभेच्छा! कधी एकदा हा सिनेमा बघतेय असं झालंय!’



महत्वाच्या बातम्या :