आपल्याकडे खूप सिनेमे येतात. अनेक विषयांवर भाष्य करणारे सिनेमे आपण पाहतो. पण या सगळ्यात लहान मुलांचं भावविश्व उलगडणारं काही आपल्याकडे बनत नाही. बऱ्याच दिवसांनी मराठी रंगभूमीवर अलबत्या गलबत्या सारखं नाटक आलं आणि आबालवृद्धांचा ओढा या नाटकाकडे वळला. अर्थात ते लहानग्यांसाठीच केलेलं नाटक होतं. मोठ्यांनी लहानांसाठी केलेलं नाटक. धप्पा या निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित सिनेमाची गोष्ट वेगळी आहे. हा सिनेमा लहान मुलांचा आहे. पण तो केवळ लहानांचा नाही, तर लहान मुलांनी बघता बघता मोठ्यांच्या डोळ्यात घातलेल्या अंजनाची ही गोष्ट आहे. म्हणून या सिनेमाचं महत्त्व वाढतं. अर्थातच लहान मुलं याच्या केंद्रस्थानी असल्यामुळे हा सिनेमा समजायला सोपा, गमतीदार आणि तितकाच रंजक आहे. पण असं असूनही दिग्दर्शकाचं म्हणणं तो सांगत राहतो. लहान मुलांनी या सिनेमातली गोष्ट बघावी आणि मोठ्यांनी या गोष्टीत दडलेला गर्भित अर्थ समजून घ्यावा असं हे सॅंडविच आहे.

सिनेमाची गोष्ट खूप सोपी साधी. पुण्यात एका गणेशोत्सवावेळी सोसायटीतली मुलं एक नाटुकलं बसवायचं ठरवतात. नाटुकलं ठरतं. तसं ते दरवर्षीच ते बसवत असतात. त्यामुळे सोसायटीमध्ये नाटक हा कुतूहलाचा विषय असतो. तर यंदा नाटुकल्यात असतात तुकाराम, माकड, झाडं, परी आणि येशूही. या नाटुकल्यात येशू असल्याची बातमी फिरते आणि नाटक बंद पाडलं जातं. गणेशोत्सवात फक्त गणपतीच हवा, येशू नको असा आग्रह धरला जातो. तथाकथित धर्मरक्षक सोसायटीत तोडफोड करतात. पण ही मुलं नाटक करायचं ठरवतात. त्याची ही गोष्ट.

महत्वाची बाब अशी की ही एक सत्य घटना आहे. पुण्यात खराच असा प्रकार झाला होता. पण ते नाटक बंद पाडल्यानंतर पुढं काही झालं नव्हतं. कथा, पटकथा लेखक गिरीश कुलकर्णी यांनी त्याला कल्पनेची जोड देत हा सिनेमा लिहिला आणि त्याला नाव दिलं धप्पा. एक अत्यंत महत्त्वाचा विषय दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने मांडला आहे. सोपी सुटसुटीत भाषा आणि गहिरा अर्थ ही याची खासियत.

पहिल्या फ्रेमपासून चित्रपट पकड घेतो. ट्रेलरमध्ये दिसणारं रिक्षांचं चेसिंग यात दिसतं आणि सिनेमा सुरु होतो. अत्यंत सोपी पटकथा, महत्त्वाचे संवाद या दोन गोष्टी जमेच्या. राजकारण म्हणजे काय, सुशिक्षितांनी गप्प बसण्याचा संवाद किंवा सुह्रदने भाऊंना विचारलेला गणपती उत्सवाबाबतीतला प्रश्न अनेक मुद्द्यांना अधोरेखित करतो. शिवाय संकलन, संगीत, कलादिग्दर्शन, व्यक्तिरेखा निवड आदी अचूक झाल्याचा मोठा फायदा सिनेमाला झाला आहे. दिग्दर्शकाचं दिग्दर्शकीय कसबही दिसणारं.. जाणवणारं. लहान मुलांचे भाव त्यांनी अचूक टिपले आहेत. पण त्यासोबतच काही फ्रेम्स अफाट जमल्या आहेत. झोपलेल्या बाबासमोर माकडाच्या वेशात आलेला मुलगा.. मुलांमध्ये दडलेले सुपरहिरो.. आदी खूप फ्रेम्स मस्त जमल्या आहेत.

या सिनेमात सर्वच कलाकारांनी चोख काम केलं आहे. अर्थात त्याचं श्रेय दिग्दर्शकाला जातं. सिनेमातली मुलं याची खरे हिरो आहेत. पण सोबत गिरीश कुलकर्णी, उमेश जगताप, श्रीकांत यादव, ज्योती सुभाष, इरावती हर्षे, वृषाली कुलकर्णी, सुनील बर्वे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

एकूणच व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मांधता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी अनेक मुद्यांचा मिळून हा चित्रपट बनला आहे. खूप महत्वाचा सिनेमा. उत्तम पद्धतीने साकारलेला. त्यामुळे हा एक सर्वांगसुंदर चित्रपट बनला आहे. निरागसता हा याचा मोठा प्लस पाॅइंट आहे. त्या निरागसतेने ही मुलं जेव्हा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा ते जास्त टोकदार झालेले भासतात. हा सिनेमा जरुर जरुर पाहावा. कुटुंबातील सर्वांना घेऊन हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

आजच्या अरे ला कुणीतरी का रे केलं पाहिजेच की... नवी पिढी ते काम करेल असा विश्वाास यात दिसतो. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या चित्रपटाला देतो आहोत चार स्टार्स. 

व्हिडीओ :