Devendra Fadnavis: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha salian) यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मोठी अपडेट दिली आहे. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूजच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, तेव्हापासून या प्रकरणाबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही, याबाबत देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘रिपब्लिक टीव्ही’ च्या मुलाखतीमध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, 'या प्रकरणाचा तपास सुरू असून पुराव्यांची विश्वासार्हताही तपासली जात आहे.'
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'याआधी या प्रकरणाची जी काही माहिती उपलब्ध होती ती ऐकीव माहिती होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून ते पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे.'
'सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की नाही, हे तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन' असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती.
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: