Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. यावर अद्याप नवनवीन खुलासे अन् दावे केले जात आहेत. आता मुंबईतील रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्यानं धक्कादायक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केली नाही, त्याची हत्याच झाल्याचा दावा, या कर्मचाऱ्यानं केलाय. मुंबईमधील कूपर रुग्णालयात मॉर्चरीमधील कर्मचारी रुपकुमार शाह यानं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा दावा केलाय. 


रुपकुमार शाह म्हणाला की, ' जेव्हा सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह पाहिला तेव्हा मला हे आत्महत्या केली नसल्याचं वाटलं. त्यांच्या शरिरावर दुखापतीचे व्रण होते. मी ही बाब माझ्या सिनिअरला सांगितली. मात्र यावर आपण पुन्हा चर्चा करुयात, असे त्यांनी सांगितलं.'  अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर अडीच वर्षानंतर रूपकुमार शाह यांनी केलेल्या दाव्यानंतर खळबळ माजली आहे.  रूपकुमार शाह यांनी असाही दावा केलाय की,  सुशांत सिंह यांचं पोस्टमार्टम झालं, तेव्हा ते उपस्थित होते. एएनआयनं याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केलाय. 






एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रूपकुमार शाह म्हणाले की, या प्रकरणावर मी याआधीही प्रसारमाध्यमांशी बोललो आहे. मी यासाठी बोलत आहे की, 14 आणि 15 जून रोजी मी ड्यूटीवर होतो. त्याचवेळी एक व्हीआयपी मृतदेह आला होता. लोकांचीही प्रचंड गर्दी झाली होती. आम्ही आमचं काम सुरु केलं. रात्री 11 ते 12 वाजता सुशांतच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टमचा नंबर आला होता.'


'पोस्टमार्टमला आलेल्या मृतदेहाला पाहिल्यानंतर हा सुशांतसिंहचा असल्याचं लगेच समजलं.  सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह वेगळाच दिसत होता... आत्महत्या केल्यासारखं दिसत नव्हता. मी तात्काळ माझ्या सिनिअरशी याबाबत बोललो. मी त्यांना म्हटलं की, सर हे वेगळीच घटना वाटतेय. कारण माझा 28 वर्षाचा अनुभव आहे.. पण सिनिअर मला म्हणाले, आपण यावर पुन्हा बोलूयात, असे रुपकुमार शाह म्हणाले'


शाह पुढे म्हणाले की,  ' आत्महत्या केलेल्या मृतदेहाच्या गळ्याला फाशीचा व्रण असतो..त्याला हँगिंग मार्क म्हटलं जातं... पण सुशांतच्या मृतदेहावर असणारा व्रण वेगळाच होता. त्याशिवाय पाय आणि हाथावरही वेगवेगळे व्रण होते. याबाबत आता मी आणखी सविस्तर बोलू शकत नाही.'