Chhello Show : भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आलेल्या ‘छेल्लो शो’ (Chhello Show) या गुजराती चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चिमुकल्यांच्या स्वप्नांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा विशेष प्रीमिअर सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमिअर सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दिमाखात हा सोहळा पार पडला आहे.
95व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी परदेशी भाषा श्रेणीत नामांकनासाठी भारताने पाठवलेल्या गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' (द लास्ट शो) चा भव्य प्रीमिअर आज मुंबईत पार पडला. या प्रीमिअरमध्ये बॉलिवूड स्टार्स दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कियारा अडवाणी (Kiara Advani), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor), विद्या बालन (Vidya Balan), निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर (Siddharth Roy Kapoor), जावेद जाफरी (Javed Jaffrey), अनुष्का रंजन (Anushka Ranjan), अपारशक्ती खुराना, रोहित सराफ, कीर्ती कुल्हारी, रसिका दुग्गल यांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘छेल्लो शो’चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, दिग्दर्शक निखिल अडवाणी, पान नलिन आदींनी देखील उपस्थिती लावली होती.
चित्रपटाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
'छेल्लो शो' हा चित्रपट 14 ऑक्टोबरला देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ऑस्कर नामांकनासाठी पाठवल्यामुळे देखील हा चित्रपट वादात सापडला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) या चित्रपटाला केवळ परदेशी चित्रपटच नाही, तर हॉलिवूड चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'चा रिमेक असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र, ही संपूर्ण निवड प्रक्रिया सांभाळणाऱ्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) ही निवड प्रक्रिया पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, 'छेल्लो शो' हा चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'पासून प्रेरित असेल, तर हा चित्रपट ऑस्कर निवड फेरीतून बाहेर पडू शकतो.
एकदा चित्रपट ठरला अपात्र मग....
'छेल्लो शो' गेल्या वर्षीही ऑस्करच्या नामांकनासाठी पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या चित्रपटाचे प्रदर्शन न झाल्यामुळे ज्युरींनी हा चित्रपट नाकारला आणि आता स्क्रिनिंग झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा पात्र म्हणून घेण्यात आला होता. तर, ही पद्धत चुकीची असून, पुन्हा एखाद्या चित्रपटाला नामांकनाच्या प्रवेशिकेत स्थान कसे मिळू शकते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. जर ही पद्धत योग्य असेल तर 10 वर्ष जुन्या चित्रपटांना देखील प्रवेश द्यावा, असे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी म्हटले होते.
हेही वाचा :
Chhello Show : ‘छेल्लो शो’, प्रकाश ओंजळीत भरण्याची स्वप्न पाहणाऱ्या ‘समय’ची कथा!
Rahul Koli: 'छेल्लो शो' चित्रपटातील बालकलाकाराचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी