Chhello Show : यंदा भारताकडून ‘ऑस्कर’ नामांकनासाठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव नुकतेच जाहीर करण्यात आले. अनेकांना वाटलं होतं की, ‘द कश्मीर फाइल्स’ किंवा ‘आरआरआर’चं नाव घोषित होऊ शकतं. पण, या सगळ्यांना मागे टाकत गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ने बाजी मारली. आता हा कधीही नाव न ऐकलेला चित्रपट थेट ऑस्कार नामांकनासाठी पाठवला जातो, हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी हा चित्रपट लगेच गुगलवर शोधण्यास सुरुवातही केली. एखादा चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी पाठवला जातो म्हणजे नक्की त्यात काहीतरी खास असणारच.. असं म्हणत सगळ्यांनीच हा चित्रपट शोधण्यास सुरुवात केली. अर्थात काहींना हा चित्रपट सहज सापडला, तर काही मात्र ‘ढुँढते रह जाओगे’ याच फेजमध्ये अडकले आहेत. ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांना हा चित्रपट ऑस्करवारीसाठी पाठवला जातोय, हे ऐकून नक्कीच आनंद झाला असणार. अगदी हाईप असणाऱ्या बिग बजेट बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांना मागे टाकत आपली दखल घ्यायला भाग पडणाऱ्या ‘छेल्लो शो’ची कथाही अगदी मनाला भावणारी आहे.
‘छेल्लो शो’ अर्थात ‘शेवटचा चित्रपट’ या नावातच मोठं कुतूहल आहे. ही कथा आहे समय नावाच्या एका 9 वर्षांच्या मुलाची, ज्याने आपलं एक ध्येय निश्चित केलं आहे आणि ते साध्य करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्याची आहे. चित्रपटाच्या ओपनिंग फ्रेममध्ये चिमुकला समय एका रेल्वे रुळांच्या शेजारी असलेल्या हिरव्यागार गवतामध्ये पडून आकाशाकडे पाहत प्रकाशाला आपल्या मुठीत कैद करू पाहत आहे. मात्र, स्वप्नांची ही दुनिया जिथे संपते, तिथे सुरु होते वास्तवाची दाहकता.. एक लहान बहीण आणि आई-वडील हे समयचं एक चौकोनी सुखी कुटुंब. ‘चलाला’ नावाच्या एका रेल्वे स्टेशनवर समयच्या वडिलांचा चहाचा स्टॉल आहे. एखादी गाडी या स्थानकात थांबली की, प्रवाशांना चहा देणं हे समयचं काम. एकटा समयचं नाही तर, त्याच्या गावातील आणखी पाच-सहा लहानं मुलं वेगवेगळ्या गोष्टी विकण्याचं काम करतात. गाडी निघून गेल्यानंतर आपल्या खेळात रमतात.
समय चित्रपट पाहायला जातो अन्...
एक दिवशी समयचे वडील संपूर्ण कुटुंबाला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जातात. आपण तर कधीच चित्रपट बघत नाही, मग आज का? असा भाबडा प्रश्न त्याला पडतो. त्यावर त्याचे वडील म्हणतात की, हा देवाचा चित्रपट आहे, म्हणून बघायचा. संपूर्ण कुटुंबं चित्रपट पाहायला जातं आणि आधीच प्रकाश ओंजळीत भरू पाहणाऱ्या समयला प्रकाशाचं एक नवं रूप पाहायला मिळतं. इथून सुरु होतो ध्येयवेड्या समयचा प्रकाशमय प्रवास... चित्रपट पाहून घरी निघालेला समय म्हणतो, मलाही चित्रपट बनवायचाय. त्यावर त्याचे वडील म्हणतात, आपण ब्राह्मण आहोत आणि हे काम आपण करू शकत नाही. यावर चिडलेला समय त्यांना म्हणतो की, मग काय आता चाय, चाय म्हणत चहा विकायचा का? चिमुकल्या समयचा हा विचार अगदी मनाला स्पर्श करून जातो.
ध्येयवेडा समय..
किती काही झालं तरी आपण चित्रपट बनवायचा, हेच आपलं ध्येय. समय एका अशा खेडेगावात राहातो, जिथून शाळेत जाण्यासाठी आधी रेल्वे आणि नंतर सायकल असा प्रवास करावा लागतो. एकदा चित्रपट पाहून भारावून गेलेला समय, वडिलांच्या गल्ल्यातून पैसे घेऊन कुणालाही न सांगता शाळा बुडवून चित्रपट पाहायला जातो. चित्रपट संपवून घरी जायला निघालेल्या समयची ट्रेन चुकते आणि ती रात्र त्याला दुसऱ्या स्टेशनवर काढावी लागते. इथे समयचे आई-वडील मुलगा घरी परत आला नाही म्हणून पोलिसांकडे जातात. तेव्हा चौकशीनंतर समयचे प्रताप उघड होतात. पहिली वेळ तर समय पकडला जातो. नंतर चित्रपट पाहण्यासाठी तो तिकीट न काढता लपूनछपून थिएटरमध्ये जातो. काही काळानंतर तिथेही पकडले गेल्याने, त्याला हाकलून दिले जाते. उदास समय आपला डबा काढून जेवणार इतक्यात एक माणूस त्याच्याकडे त्याचा डबा मागतो. समय म्हणतो मला भूक नाही, निदान तुझं पोट भरेल. खाऊन झाल्यावर तो माणूस समयला त्याच्या नाराजीचं कारण विचारतो. आपल्याला आता चित्रपट पाहता येणार नाही म्हणून वाईट वाटत असल्याचं समय त्याला सांगतो. यावर हसून तो व्यक्ती समयला एका खोलीत घेऊन जातो. ही खोली म्हणजे थिएटरची प्रोजेक्टर रूम. जेवणाच्या डबा दिल्याच्या बदल्यात इथे बसून समयला फुकटात चित्रपट पाहायला मिळतो. आता ही त्यांची डील रोज सुरु होते. घरातून शाळेत जायला निघालेला समय डबा घेऊन थेट थिएटरमध्ये पोहोचतो आणि डब्याच्या बदल्यात चित्रपट पाहतो. नुसताच चित्रपट पाहत नाहीतर, हळूहळू प्रोजेक्टर रूममधील रील जोडण्यापासून ते फिरवण्यापर्यंतची सगळी कामं शिकून घेतो.
शिकण्याची जिद्द आणि सामावून घेण्याची कला
थिएटरमध्ये फेकून दिलेल्या रीळमधील काही भाग कापून तो घरी आणतो आणि त्यातून चित्रपट नेमका कसा पाहतात यावर संशोधन सुरु करतो. यात त्याला साथ मिळते ती त्याच्या दोस्तांची. गावातील एका भग्न वाड्यात ही टोळी वेगवेगळे प्रयोग करू लागते. यासाठी आधी सुरु होतो तो प्रकाशाचा खेळ समजून घेण्याचा प्रवास.. शाळेत जात-येत असताना रेल्वेच्या डब्यात खिडक्या बंद करून प्रकाशाचा खेळ रंगतो. आपल्यासोबतच समय ‘प्रकाश ओंजळीत’ पकडण्याचं ध्येय सगळ्या चिमुकल्यांच्या मनात रुजवतो. प्रकाशाचा खेळ करून चित्र पडद्यावर दिसतात हे कळल्यावर ही टोळी प्रोजेक्टर मशीन बनवण्यासाठी भंगाराच्या दुकानातून साहित्य गोळा करते. रेल्वेच्या डब्यातून लाईटचे बल्ब आणि पंख्याची पाती काढली जातात. या सगळ्यातून बनते यांची प्रोजेक्टर मशीन. मग, रेल्वेतून स्टेशनवर उतरलेली चित्रपटांची रीळं चोरण्याचं काम सुरु होतं. यात समय पकडला जातो आणि त्याला काही दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवले जाते. इतेही शांत न बसता तो एक नवीन कसब शिकून घेतो ते म्हणजे आजूबाजूला असलेल्या गोष्टींमधून वेगवेगळे आवाज काढणं.
‘छेल्लो शो’ने सुरु होतो समयचा खरा प्रवास!
बालसुधारगृहातून बाहेर आल्यावर हेच कसब वापरून सगळे मित्र भग्न वाड्यातील मूकपटाच्या शोमध्ये आवाज देण्यास सुरुवात करतात. मुलांचे हे प्रताप समयचे वडील एका पडद्याआडून पाहत असतात. अचानक समयसाठी एक फोन येतो. हा फोन असतो फजलचा अर्थात प्रोजेक्टर रूमधील काम सांभाळणाऱ्या व्यक्तीचा. तो समयला लगेच निघून थिएटरमध्ये येण्यास सांगतो. रेल्वेची व्यवस्था नसतानाही ही चिमुकली मंडळी एक अनोखी शक्कल लढवून तिथे पोहोचतात आणि पाहतात तर काय, प्रोजेक्टर रूममधील सगळं समान बाहेर फेकून दिलं जातंय. फजल त्यांना सांगतो की, आजचा शो हा शेवटचा अर्थात ‘छेल्लो शो’ होता. कारण प्रोजेक्टर रूमच्या जागी आता नवीन टेक्नोलॉजी लावण्यात आलेली असते, ज्यासाठी एका इंग्रजी येणाऱ्या आणि मशीन हाताळू शकणाऱ्या माणसाची गरज असते, म्हणून तिथल्या जुन्या मशीनसह फजलला देखील कामावरून काढून टाकले जाते. यानंतर हे सगळं समान कुठे जात आणि त्याचं पुढे काय होतं, हे जाणून घेण्यासाठी समय समान नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करतो. या सामनातील धातूच्या वस्तू विरघळवून त्यापासून चमचे तयार केले जातात, तर निगेटिव्हचे रीळ वितळवून त्याच्या बांगड्या तयार केल्या जातात. हे सगळं पाहून आपले घळाघळा ओघळणारे अश्रू सावरत समय फजलला घेऊन पुन्हा चलाला गावात येतो. इथे फजलला एक छोटी नोकरी मिळते. तर, समय आपलं स्वप्न सोडून शिक्षणाकडे लक्ष देऊ लागतो. पण, आपल्या मुलाचं मन इथे रमत नाहीये हे त्याच्या वडिलांना चांगलंच ठाऊक होतं. ते समयला म्हणतात तुला नेहमी इथून पळून जायचं होतं ना? तुला नक्की चित्रपट बनवायचे आहेत का? तुझं उत्तर हो असेल, तर तुझ्याकडे अवघी 14 मिनिटं आहेत. आपली बॅग घे आणि बडोद्याला जाणाऱ्या गाडीत बस आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास कर. अर्थात त्याच्या वडिलांनी समयच्या पुढील शिक्षणसाठी एका मित्राकडे त्याची सोय केलेली असते. समय सगळ्यांचा निरोप घेऊन ट्रेनमध्ये चढतो. जाता जाता स्टेशनवर त्याला या प्रवासात साथ देणारे सगळेच लोक भेटतात. ज्या शिक्षकांनी त्याला स्वप्न पाहण्याची उमेद दिलेली असते, ते साश्रू नयनांनी त्याला निरोप देतात. तर, फजल आपल्या एका कृतीतून त्याला स्वप्नाची आठवण करून देतो. चिमुकली मित्रमंडळी प्रकाशचा खेळ करत समयला निरोप देतात. समय ज्या डब्यात चढतो, तो स्त्रियांसाठी राखीव असलेला डबा आहे. इथे बसलेल्या प्रत्येक महिलेच्या हातात छान रंगीबेरंगी बांगड्या आहेत. या बांगड्यादेखील समयला त्याच्या स्वप्नाची आठवण करून देतात आणि तो बांगड्यांकडे पाहून म्हणतो मनातल्या मनात म्हणतो की, हे तर मनमोहन देसाईंचं एक रूप आहे. तर इतर स्त्रियांच्या हातातील बांगड्या पाहून तो वेगवेगळ्या कलाकारांची नावं घेऊ लागतो. शेवट खिडकीतून येणारा प्रकाश स्त्रियांच्या हातातील बांगड्यांवर पडतो आणि समय त्याच्या प्रकाशाच्या खेळात रमून जातो...
चित्रपटात काय खास?
अगदी कमीत कमी संवाद वापरत केवळ दृश्यांच्या आणि प्रकाशाच्या माध्यमातून ही कथा सादर करण्यात आली आहे. यातील चिमुकला समय आपल्या स्वप्नासाठी अगदी काहीही करण्यास तयार आहे. आपलं स्वप्न केवळ आपलं नसतं, तर त्यात इतरांनाही सामील करून घेण्यात एका वेगळाच आनंद असतो, हे त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसतं. कथा खेड्यातील असली तरी, समयची अफाट बुद्धिमत्ता, त्याच्या लहान दोस्तांची साथ, वडिलांचं मूक प्रेम, सुगरण आईची माया आणि मुख्य म्हणजे खेड्यातील संस्कृती यांचं वास्तविक दर्शन घडतं. हा चित्रपट पाहताना आपणही या समयचा प्रवास जगू लागतो. कुठेही मसाला नाही, मारधाड नाही.. गोंगाट किंवा कर्णकर्कश संगीत नाही. प्रत्येक सीनमधील आजूबाजूची स्थिती आणि ठिकाण यांचा आवाज प्रेक्षकांला पडद्यावरून थेट त्या दृश्यात घेऊन जातो. स्थानिक घटकांचा अर्थात काठीयावाडी जेवण, मसाले, चहा, भाज्या, नद्या, हरीण यांचा चपखल वापर मनमोहक वाटतो. अवघ्या नऊ वर्षांचा समय खऱ्या अर्थाने ‘ऑस्कर’वारीच्या नामांकनाचा प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध होते.
‘छेल्लो शो’ या गुजराती भाषिक चित्रपटाने आजवर अनेक चित्रपट पुरस्कारांत बाजी मारली आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपट आल्याने तो प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकलेला नाही. ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात आला. पॅन नलिन यांच्या या चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर भाषेचा आडआडपडदा न ठेवता एकदा तरी नक्की पाहावा आणि समयच्या या प्रवासाचं साक्षीदार व्हावं!