Cruise Drug Case: क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजही जामीन मिळालेला नाही. आर्यन खान गेल्या 13 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज निकाल आला तेव्हा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेता यांना मोठा धक्का बसला आहे. आर्यनच्या वकिलांकडे आता या प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.
आर्यनच्या वकिलांना आता या प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय
2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यनला 'कॉर्डेलिया द इम्प्रेस' नावाच्या क्रूझवरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर 17 दिवस उलटून गेले पण ड्रग्ज प्रकरणात आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. शाहरुखचे कुटुंबही तणावात आहे. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळालेली नाहीत. पण एनसीबीने न्यायालयात दावा केला की आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे.
अटकेला 17 दिवस पूर्ण
आर्यन ड्रग्जच्या टोळीशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, केवळ बॉलिवूडशी संबंधित लोकच एनसीबीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सहसा अशा प्रकरणात जामीन पटकन मंजूर केला जातो. परंतु, आर्यनचा खटला कायदेशीर गुंतागुंतीमध्ये इतका अडकला आहे की तो 17 दिवस बाहेर येऊ शकला नाही.
सत्र न्यायालयाने 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी केल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. परंतु सुट्ट्यांमुळे हा निर्णय आजपर्यंत पुढे ढकलण्यात आला. केवळ शाहरुखच नाही तर देशाच्या नजरा सुपरस्टारच्या मुला संदर्भात सत्र न्यायालय काय निर्णय देतंय? यावर होत्या.
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अंमली पदार्थांबाबत चॅट करत होता आर्यन खान
आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीनं ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.