मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश एकत्र उभा आहे. अनेक दिग्गजांनी, सेलिब्रिटींनी कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच सर्वांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं कौतुक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवुड सेलिब्रिटींनी उचललेल्या या सकारात्मक पावलाचं कौतुक करत आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये गाण्याची लिंक शेअर करत म्हटलं आहे की, 'फिर मुस्कुराएगा इंडिया.. फिर जीत जाएगा इंडिया' भारत लढेल आणि भारत जिंकेल. चित्रपटसृष्टीकडून उचलण्यात आलेलं कौतुकास्पद पाऊल.' बॉलिवुडकरांनी केलेलं हे गाणं युट्यूब दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांना हे गाणं आवडलं असून काही तासांतच हे गाणं 6 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.
दरम्यान, देशातील जनतेचं मनोधैर्य वाढविण्यासाठी चित्रपटसृष्टीद्वारे एक सुंदर गाणं तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, भूमि पेडनेकर आणि तापसी पन्नूसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. गाण्याचे बोल आहेत, 'मुस्कुराएगा इंडिया'. गाण्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिसून आले आहेत. हे गाणं विशाल मिश्राने गायलं असून त्यानेच संगीतबद्ध केलं आहे.
'मुस्कुराएगा इंडिया'चे बोल कौशल किशोरने लिहिले आहेत. गाणं Jjust म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे. गाण्याचे बोल फार सुंदर आहेत. यामध्ये सर्व सेलिब्रिटींनी आपल्या घरातून, बाल्कनीतून शुट केलं आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्वीटर हॅन्डलवर लिहिलं आहे की, 'आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्यानंतरच भारत हसणार आहे. आपले कुटुंबिय आणि मित्रांसोबत शेअर करा.'
दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांनी मदत करणार असल्याची घोषणा केली होती. दोघांनीही आपल्या ट्वीटमार्फत याबाबत माहिती दिली होती. तर अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमान खानने FWICE मार्फत 25000 मजूरांच्या बँक खात्यांचे नंबर्स मागितले आहे. त्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. तसेच बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रूपये मदत केली आहे. तर कार्तिक आर्यन आणि विक्की कौशलनेदेखील प्रत्येकी एक कोटी रूपयांची मदत केली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत
Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत
लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर
coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत